३० वर्षांचा
रंगावली परिवाराचा अखंडित प्रवास
एखाच्या चित्रकाराच्या
कुंचल्यातून सर्रकन एखादी रेषा उमटावी, त्यात रंगकाम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब चित्र निर्माण व्हावं,
असा अनुभव आपण अनेकदा घेतो. पण त्याच चित्रकाराच्या जागी जर रांगोळीकार
असेल तर! ही गोष्ट अशक्य वाटते ना? हीच अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न केलाय जोगेश्वरीतल्या रंगावली
परिवाराने.
दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी, गोडा-तिखटाचा फराळ आणि दरवाज्यात सुंदर
रांगोळी. रांगोळी हा विषयच असा आहे की तो शब्द जरी कानावर पडला तरी मराठी माणसांच्या
चेह-यावर एक स्मितरेषा उमटतेच. आजकाल अनेक कलाप्रेमी खास रंगावलीचं
प्रदर्शन भरवू लागले आहेत. रांगोळी
प्रदर्शन भरवणं खरं तर खूप वेगळं आणि आनंददायी आहे. रांगोळी प्रदर्शन किती जणांनी
पाहिलं याहीपेक्षा आम्ही ते भरवलं आणि आम्हांला नवीन काहीतरी शिकायला मिळालं या
गोष्टीचं समाधान या कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसून येतं. कलाकारांच्या बोटात एवढी
जादू असते की रसिक त्यात गुंगुनच गेलाच पाहिजे! असेच कलाकार जोगेश्वरीतल्या
रंगावली परिवाराला लाभले आणि या परिवाराचा आज वटवृक्ष झाला.
जोगेश्वरीमधील बांद्रेकरवाडी तशी सर्वांच्याच परिचयाची.... दिवाळीमध्ये सर्वांची पावलं वळतात ती बांद्रेकरवाडीतल्या समर्थ विद्यालयात.
याच विद्यालयामध्ये दरवर्षी रंगावली परिवार रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करतं. यंदा
या परिवाराचं हे तिसावं वर्ष आहे. दरवर्षी काहीना काही नाविण्य आणण्याचा प्रयत्न
रंगावली परिवार करत असते. यामध्ये सामाजिक, राजकीय, चित्रपट क्षेत्रातील
कलाकारांचे हुबेहुब चित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात येतात. या परिवात
ज्युनिअर, सिनिअर अशी काही भानगडच नसते. प्रत्येक जण कुणाला काहींना काहीतरी
शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. या परिवाराचं टीमवर्क उल्लेखनीय असल्यामुळे आज या
परिवारात सगळेच कलाकार प्राथमिक स्वरुपाच्या रांगोळ्यांपासून थेट व्यावसायिक
दर्जाच्या रांगोळ्या काढताना दिसतात. रांगोळ्यांच्या माध्यमातूनच अनेकांनी आपली
वेगळी ओळख निर्माण केलीये. या परिवाराची सुरुवात करताना समविचारी हौशी कलाकार
एकत्र आले आणि आज तीस वर्षानंतर त्याचा वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आर्थिक
पाठबळ नसतानाही आपल्या जिद्दीवर आणि केवळ आपली हौस म्हणून रांगोळी प्रदर्शन
भरवणारं जोगेश्वरीतलं एकमेव रंगावली परिवार...
आज या रंगावली परिवारातल्या तीस ते चाळीस कलाकारांनी
आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीये. या परिवारातला कोणताही कलाकार हा बक्षिसासाठी
किंवा मानधनासाठी रांगोळी काढत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारत, एकमेकांना
मदत करत, रांगोळी काढण्यातला पुरेपूर आनंद हे कलाकार घेतात.
या परिवारात सगळेच आर्टिस्ट नाहीत. कुणी आयटी क्षेत्रातला तर कुणी वेगळ्याच
क्षेत्रातले खास आपला वेळ काढून रात्रीचा दिवस करुन आपली रांगोळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. एखादा चुकत असेल तर त्याला मार्गदर्शन करणं, त्याच्याकडून ते
करवून घेणं हा या परिवाराचा जणू काही अट्टहासचं. आपली रांगोळी अयोग्य वाटली तर त्यावर झाडू मारला
जाणार हा कमी अधिक प्रमाणात दिला जाणारा धाक असे परंतु या धाकामुळे अनेक कलाकार
घडले. टीमवर्क हे मोठं
वैशिष्ट्य या परिवाराचं म्हणावं लागेल.
रांगोळी काढण्यासाठी शाळेतली जागा उपलब्ध करणं, सर्व
वर्ग स्वच्छ करणं, वर्गातील बाकं लावणं, फरशी पुसण्यापासूनची सर्व कामं रंगावली
परिवारातले कलाकाराचं करतात. सामाजिक मूल्य जपण्याचा प्रयत्न रंगावली परिवार करत
आहे. हौशी कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ या परिवाराने उपलब्ध करुन दिलंय. हौशी ते व्यावसायिक कलाकार असा रंगावली
परिवाराचा प्रवास अखंडपणे चालू आहे.
या परिवाराची लौकप्रियता एवढी की, या परिवारातले काहीजण
हे चारकोप, बोरिवली, वसई, दहिसर, डोबिंवलीहून येणारे आहेत. या परिवारामध्ये
स्थानिक तरुणांचाही सहभाग आहे. रांगोळी प्रदर्शनाबरोबर काही
प्रात्याक्षिकही दाखवण्याचा प्रयत्न रंगावली परिवार करते. गेल्या वर्षी कुंभार
मातीची भांडी कशी बनवतो याचं प्रात्याक्षिक दाखवण्यात आलं तसंच संस्कार भारती
रांगोळीचं प्रात्याक्षिकही विनामूल्य भरवण्यात आलं होतं. त्यामुळे रंगावली
परिवारामध्ये येणारा प्रत्येकजण इथे काहींना काही नक्कीच आपल्यासोबत घेऊन जातो असा
अनेक रसिकांचा अनुभव आहे.
रंगावली परिवारामध्ये वेगवेगळे प्रयोगही केले जातात
जसे की रांगोळीऐवजी वेगवेगळ्या मीडियाचा वापर करुन रांगोळी साकारली जाते. लाकडाचा
भुसा, मीठ, साबुदाणा, तांदूळ, डाळ, वाळू अशा निरनिराळ्या पद्धतीचा वापर करुन
आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात. या परिवाराचं वेगळेपण म्हणजे एक ठराविक विषयाला
अनुसरुन रांगोळ्या काढल्या जातात. या वर्षीचा विषय आहे एक्सप्रेशंन्स. मार्केटमध्ये
जसा ट्रेंड असेल तो ट्रेंड रंगावली परिवारामध्ये पाहायला मिळतो. होणार सून मी या
घरची मधली जान्हवी असेल, मिस्टर बिन, टाइमपासमधील प्राजक्ता, दगडू, नाना पाटेकर आणि
आत्ताची लेटेस्ट जय मल्हार तसंच दाभोळकर सामाजिक विषयाला अनुसरुन असणाऱ्या लक्षवेधी
रांगोळ्यांचा खजिना रंगावली परिवारामध्ये
पाहायला मिळतो.
रांगोळीला कष्ट भरपूर आहेत, त्यातून
मिळकत काहीच नाही पण यातून मिळणारं समाधान खूप आहे. त्याची तुलना होऊच शकत नाही. एक
रांगोळी काढणाराच ते समजू शकतो ! आपण कितीही चांगली रांगोळी काढली असली तरी, जाताना मलाच ती पुसायची आहे याची खंत जरी वाटत असली तरी त्यात गुंतायचे नाही
निर्विकारपणे पुसून पुढे जायचे ही शिकवण या रांगोळी कलाकारांकडून शिकता येते.
या परिवारातल्या रांगोळ्या पाहताना रसिकांची
नजर खिळते ती व्यक्ती चित्रांकडे. माधुरी दिक्षित, अमिताभ
बच्चन, बाळासाहेब ठाकरे, शिवाजी महाराज
यांची चित्रं हुबेहूब वाटतात. जणू काही एखादे पोट्रेट काढूनच जमिनीवर अंथरले आहे.
प्रत्येकजण ते बघताना प्रथम हे चित्र आहे की, खरोखरची रांगोळी
याची खात्री करून घेणारच. अशा रांगोळ्यांचा आस्वाद घ्यायला विसरु नका. सौंदर्याचा आनंद काय
असतो अनुभवयाचा असेल तर रंगावली परिवाराच्या रांगोळ्यांना जरुर भेट द्या.