Friday 28 November 2014


कौतुकाचा वर्षाव की सहानुभूती ?? 

कोकणात जायचं म्हणटलं तर साऱ्या प्रवाशांची पावलं आपसुकच वळतात ती कोकण रेल्वेकडे... कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित नसल्याचा निर्वाळा सुरक्षा आयुक्तांनी यापूर्वीच दिला होता पण असं असलं तरी खिशाला परवडणारं तिकीट आणि जलद गतीचा प्रवास यामुळेच कोकण रेल्वे सदानकदा ओव्हरलोडेड दिसते. रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे ट्रॅकमॅन नेहमीच दक्ष असतात... सचिन पाडावे त्यापैकीच एक... आज सचिन पाडावे यांच्या प्रसंगावधनाने कोकणकन्या एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले... अशा या कोकणच्या सुपूत्राचं अनेकांनी कौतुकही केलं. बॅकस्टेजला काम करणाऱ्या कोकणपुत्राच्या शौर्याची बातमी सर्वच न्यूज पेपरमध्ये फ्रंट पेजला छापण्यात आली होती... पण या सचिनच्या पदरात कोकण रेल्वे प्रशासनाने मात्र फक्त ३०० रुपयांची मानधन भीक घातली. एवढचं नाही तर त्याला खडे बोलही सुनावले....

सचिन पाडावे... रेल्वेमार्गावर गस्त घालण्याचं काम करतात. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रत्नागिरी तालुक्यातील लाजुळ इथल्या एका पुलावर रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्वरित रेल्वे कंट्रोल रुम आणि उक्षी स्टेशनला याबाबतची माहिती दिली. मात्र तोपर्यंत उक्षी स्टेशनवरून कोकणकन्या एक्स्प्रेस सुटल्याची माहिती त्यांना मिळाली.  ताशी ७५ किमी वेगानं येणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसला थांबवणं गरजेचं होतं. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातल्या टॉर्चच्या साहाय्यानं सचिन तुटलेल्या ट्रॅकपासून उक्षी स्टेशनच्या दिशेनं धावत सुटले आणि हातातल्या बॅनरनं उक्षी बोगद्याजवळ असलेल्या कोकणकन्या एक्सप्रसेच्या इंजिन चालकाला त्यांनी धोक्याची खूण केली. इंजिन चालकानंही प्रसंगावधान दाखवून त्वरित ब्रेक दाबला आणि कोकणकन्या एक्सप्रेस तुटलेल्या ट्रॅकच्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरावर थांबवली आणि कोकणकन्येचा अपघात टळला. 
ताशी ७५ किमी वेगाने धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस त्या तुटलेल्या ट्रॅकवरुन गेली असती तर ती थेट नदीत कोसळली असती आणि हजारो प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले असतेमात्र ट्रॅकमॅन सचिन पाडावे यांच्या प्रसंगावधनामुळे कोकणकन्या एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. आपली चोख जबाबदारी पार पाडणाऱ्या सचिनच्या शौर्यामुळेच कोकणकन्या एक्सप्रेसचा अपघात टळला...
कौतुकाचा वर्षाव सचिनवर तर होत होताच पण कोकण रेल्वे प्रशासनाचं तोंड काहीसं कडवं झालं होतं... रेल्वे प्रशासनाची परमिशन न घेता वार्ताहरांना आपली कामगिरी सांगितल्यामुळे सचिन यांना कोकण रेल्वे प्रशासनानं दटावणी केली... परंतु जीवाची बाजी लावून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवताना त्यांनी बजावलेली ड्यूटी या प्रशासनाला कदाचित समजलीच नसावी आणि म्हणूनच एवढा अपघात टाळणाऱ्या कोकणपुत्राला फक्त ३०० रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं असावं...

रेल्वे प्रशासनानं पाडावे यांना दिलेली वागणूक पाहता रेल्वे प्रशासनाची खरचं कीव वाटू लागली आणि भर उन्हांत ट्रॅकची तपासणी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची ड्यूटी डोळ्यासमोर तरळू लागली...

Friday 21 November 2014


इंजिनिअरते बाबा

१९५१मध्ये हरयाणातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला रामपाल आज स्वयंघोषित अध्यात्मिक संत (बाबा) झालाय ... कधी काळी सरकारी इंजिनिअर असणाऱ्या रामपालला वागणूक योग्य नसल्यानं नोकरी गमवावी लागली... हे झाल्यावर तरी एखादा शहाणा झाला असता, पण नाही.... याला संत कबीर यांचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला... मग काय इंजिनियर रामपालनं थेट बाबा रामपाल असा अवतारच धारण केला... आजकाल कुणालाही असाच साक्षात्कार होतो, मग तो स्वत:ला संत म्हणवून घेतो आणि सुरू होतो सत्संग... किंवा श्रद्धेचा बाजार... बाबा रामपालनं याच बाजारातून चांगला १०० कोटींचा भरभक्कम मलिदा जमवला.

हरयाणातल्या बरबालामध्ये १२ एकर परिसरात रामपाल बाबानं आश्रम थाटला. या आश्रमात भक्तांची तर कमतरताच नव्हती. भक्तांसाठी खास एसी रुम, लेक्चर देण्यासाठी हॉलमध्ये मोठ-मोठे एलइडी स्क्रीन्स... रामपाल बाबा BMW, मर्सिडीजशिवाय कुठे हिंडतही नव्हता... मार्केटिंग कसं करावं याचं अचूक गणित रामपालनं जाणलं आणि अभियांत्रिकी डोक्याची त्याला जोड दिली. म्हणूनच त्याची स्वत:ची वेबसाइटही आहे.  याच वेबसाइटवरून बाबा रामपाल ग्यान देत होता. एवढंच नाही, या वेबसाइटवर रामपालचा संत्संगही लाइव्ह दाखवला जात होता. आजच्या जमान्याला सूट होण्यासाठी या भोंदूबाबाचं फेसबुक, यू-ट्यूबलाही अकाउंट होतंच. साहजिकच बाबाचे फॅन्सफॉलोअर्सही भरपूर...

कोणत्याही देवाला मानत नाही, पण बाबा रामपाल स्वत:ला मात्र परमेश्वराचा अवतार समजतो. ध्यान करणाऱ्या बाबाला त्याचे भक्त दुधानं अंघोळ घालायचे आणि त्याच दुधापासून बनवलेली खीर प्रसाद म्हणून खायचेही... आर्य समाजाशी संघर्ष करणाऱ्या या बाबावर खुनाचा गुन्हाही आहे. २००६ मध्ये रामपालच्या समर्थकांनी गावकऱ्यांवर गोळीबार केला त्यात एक महिला ठार झाली. त्यावेळी तो तुरुंगातही गेला होता. २०१३ मध्ये स्थानिकांसोबत झालेल्या संघर्षात तिघांना जीव गमवावा लागला. कोर्टाच्या आदेशानंतरही हा बाबा सलग तब्बल ४२ वेळा सुनावणीला गैरहजरच राहिला. अशा या निर्लज्ज बाबा रामपालला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना जिवाचं रान करावं लागलं. पण बिचारे पोलीस तरी काय करणार? ४ हजारांवर सशस्त्र फौजच या बाबाकडे होती. स्वत:च्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या राष्ट्रीय समाज सेवा समितीतला (RSSS)  जवान आपल्या बाबाचं संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक बंदुकीसह सज्ज असायचा.

बाबा रामपालचे हे कारनामे, कारस्थानं पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकातच जावी. पण मुद्दा असा आहे की, खून प्रकरणात कोर्टानं वॉरंट बजावल्यावरही हजर न होणाऱ्या बाबासाठी जीव ओवाळणारे भक्त कसे निर्माण होतायत? हाती बंदूक घेऊन बाबाला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच थेट फायरिंग करण्याचं धैर्य त्याचे कमांडो कसं दाखवतायत? हे रक्षक रक्षणाचं कामच करत होते, असं कुणी म्हणेल. पण, बाबाला पोलिसांनी नेऊ नये, यासाठी रस्ता अडवणारे भक्तही दिसत होतेच. ही अंधश्रद्धा कुठून येते? याचं समर्थन कोण कसं करू शकेल? रामपाल पोलिसांना शरण जाईपर्यंत चार महिला आणि एक दीड वर्षांचं चिमुकलं बाळ मृत्युमुखी पडलं. हे ऐकल्यावर तर लाजेनं मानच खाली गेली...

बुवाबाजी करून इतरांना टोप्या घालणारे बरेच बाबा आपण पाहिलेत. पण सशस्त्र कमांडोच बाळगून पोलिसांना विरोध करणारा, थेट कायद्यालाच आव्हान देणारा बाबा रामपाल बहुधा पहिलाच असावा. अखेर हा बाबा रामपाल गजाआड गेलाय. पण त्याच्या अटकेमुळे हे प्रकरण संपलं, असं म्हणायचं का? सतपाल आश्रमातून इंजिनिअर बाबाला अटक झाली असली, तरी या अटकेतून अनेक प्रश्न  नव्यानं उपस्थित झालेयत.

संत कबीर यांचा अनुयायी म्हणवून घेणाऱ्या रामपालबाबाची वृत्ती पाहिल्यानंतर खरोखरचं त्यानं कबीर वाचलं असेल का? अशी शंका निर्माण होतेय... आजपर्यंत अनेक भोंदूबाबांची कटकारस्थानं उघडकीस आली तरीही लोकांना शहाणपण का सूचत नाही? एखाद्या भाविकाची भक्ती इतकी आंधळी कशी काय असू शकते....?

         



Wednesday 19 November 2014


३० वर्षांचा रंगावली परिवाराचा अखंडित प्रवास



एखाच्या चित्रकाराच्या कुंचल्यातून सर्रकन एखादी रेषा उमटावी, त्यात रंगकाम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब चित्र निर्माण व्हावं, असा अनुभव आपण अनेकदा घेतो. पण त्याच चित्रकाराच्या जागी जर रांगोळीकार असेल तर! ही गोष्ट अशक्य वाटते ना? हीच अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न केलाय जोगेश्वरीतल्या रंगावली परिवाराने.

दिवाळी  म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी, गोडा-तिखटाचा फराळ आणि दरवाज्यात सुंदर रांगोळी. रांगोळी हा विषयच असा आहे की तो शब्द जरी कानावर पडला तरी मराठी माणसांच्या चेह-यावर एक स्मितरेषा उमटतेच. आजकाल अनेक कलाप्रेमी खास रंगावलीचं प्रदर्शन भरवू लागले आहेत. रांगोळी प्रदर्शन भरवणं खरं तर खूप वेगळं आणि आनंददायी आहे. रांगोळी प्रदर्शन किती जणांनी पाहिलं याहीपेक्षा आम्ही ते भरवलं आणि आम्हांला नवीन काहीतरी शिकायला मिळालं या गोष्टीचं समाधान या कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसून येतं. कलाकारांच्या बोटात एवढी जादू असते की रसिक त्यात गुंगुनच गेलाच पाहिजे! असेच कलाकार जोगेश्वरीतल्या रंगावली परिवाराला लाभले आणि या परिवाराचा आज वटवृक्ष झाला.

जोगेश्वरीमधील बांद्रेकरवाडी तशी सर्वांच्याच परिचयाची....  दिवाळीमध्ये सर्वांची पावलं वळतात ती बांद्रेकरवाडीतल्या समर्थ विद्यालयात. याच विद्यालयामध्ये दरवर्षी रंगावली परिवार रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करतं. यंदा या परिवाराचं हे तिसावं वर्ष आहे. दरवर्षी काहीना काही नाविण्य आणण्याचा प्रयत्न रंगावली परिवार करत असते. यामध्ये सामाजिक, राजकीय, चित्रपट क्षेत्रातील कलाकारांचे हुबेहुब चित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात येतात. या परिवात ज्युनिअर, सिनिअर अशी काही भानगडच नसते. प्रत्येक जण कुणाला काहींना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. या परिवाराचं टीमवर्क उल्लेखनीय असल्यामुळे आज या परिवारात सगळेच कलाकार प्राथमिक स्वरुपाच्या रांगोळ्यांपासून थेट व्यावसायिक दर्जाच्या रांगोळ्या काढताना दिसतात. रांगोळ्यांच्या माध्यमातूनच अनेकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. या परिवाराची सुरुवात करताना समविचारी हौशी कलाकार एकत्र आले आणि आज तीस वर्षानंतर त्याचा वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आर्थिक पाठबळ नसतानाही आपल्या जिद्दीवर आणि केवळ आपली हौस म्हणून रांगोळी प्रदर्शन भरवणारं जोगेश्वरीतलं एकमेव रंगावली परिवार...

आज या रंगावली परिवारातल्या तीस ते चाळीस कलाकारांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीये. या परिवारातला कोणताही कलाकार हा बक्षिसासाठी किंवा मानधनासाठी रांगोळी काढत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारत, एकमेकांना मदत करत, रांगोळी काढण्यातला पुरेपूर आनंद हे कलाकार घेतात. या परिवारात सगळेच आर्टिस्ट नाहीत. कुणी आयटी क्षेत्रातला तर कुणी वेगळ्याच क्षेत्रातले खास आपला वेळ काढून रात्रीचा दिवस करुन आपली रांगोळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. एखादा चुकत असेल तर त्याला मार्गदर्शन करणं, त्याच्याकडून ते करवून घेणं हा या परिवाराचा जणू काही अट्टहासचं. आपली रांगोळी अयोग्य वाटली तर त्यावर झाडू मारला जाणार हा कमी अधिक प्रमाणात दिला जाणारा धाक असे परंतु या धाकामुळे अनेक कलाकार घडले. टीमवर्क हे मोठं वैशिष्ट्य या परिवाराचं म्हणावं लागेल.

रांगोळी काढण्यासाठी शाळेतली जागा उपलब्ध करणं, सर्व वर्ग स्वच्छ करणं, वर्गातील बाकं लावणं, फरशी पुसण्यापासूनची सर्व कामं रंगावली परिवारातले कलाकाराचं करतात. सामाजिक मूल्य जपण्याचा प्रयत्न रंगावली परिवार करत आहे. हौशी कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ या परिवाराने  उपलब्ध करुन दिलंय. हौशी ते व्यावसायिक कलाकार असा रंगावली परिवाराचा प्रवास अखंडपणे चालू आहे.


या परिवाराची लौकप्रियता एवढी की, या परिवारातले काहीजण हे चारकोप, बोरिवली, वसई, दहिसर, डोबिंवलीहून येणारे आहेत. या परिवारामध्ये स्थानिक तरुणांचाही सहभाग आहे. रांगोळी प्रदर्शनाबरोबर काही प्रात्याक्षिकही दाखवण्याचा प्रयत्न रंगावली परिवार करते. गेल्या वर्षी कुंभार मातीची भांडी कशी बनवतो याचं प्रात्याक्षिक दाखवण्यात आलं तसंच संस्कार भारती रांगोळीचं प्रात्याक्षिकही विनामूल्य भरवण्यात आलं होतं. त्यामुळे रंगावली परिवारामध्ये येणारा प्रत्येकजण इथे काहींना काही नक्कीच आपल्यासोबत घेऊन जातो असा अनेक रसिकांचा अनुभव आहे.



रंगावली परिवारामध्ये वेगवेगळे प्रयोगही केले जातात जसे की रांगोळीऐवजी वेगवेगळ्या मीडियाचा वापर करुन रांगोळी साकारली जाते. लाकडाचा भुसा, मीठ, साबुदाणा, तांदूळ, डाळ, वाळू अशा निरनिराळ्या पद्धतीचा वापर करुन आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात. या परिवाराचं वेगळेपण म्हणजे एक ठराविक विषयाला अनुसरुन रांगोळ्या काढल्या जातात. या वर्षीचा विषय आहे एक्सप्रेशंन्स. मार्केटमध्ये जसा ट्रेंड असेल तो ट्रेंड रंगावली परिवारामध्ये पाहायला मिळतो. होणार सून मी या घरची मधली जान्हवी असेल, मिस्टर बिन, टाइमपासमधील प्राजक्ता, दगडू, नाना पाटेकर आणि आत्ताची लेटेस्ट जय मल्हार तसंच दाभोळकर सामाजिक विषयाला अनुसरुन असणाऱ्या लक्षवेधी रांगोळ्यांचा खजिना  रंगावली परिवारामध्ये पाहायला मिळतो. 

रांगोळीला कष्ट भरपूर आहेत, त्यातून मिळकत काहीच नाही पण यातून मिळणारं समाधान खूप आहे. त्याची तुलना होऊच शकत नाही. एक रांगोळी काढणाराच ते समजू शकतो ! आपण कितीही चांगली रांगोळी काढली असली तरी, जाताना मलाच ती पुसायची आहे याची खंत जरी वाटत असली तरी त्यात गुंतायचे नाही निर्विकारपणे पुसून पुढे जायचे ही शिकवण या रांगोळी कलाकारांकडून शिकता येते.

या परिवारातल्या रांगोळ्या पाहताना रसिकांची नजर खिळते ती व्यक्ती चित्रांकडे. माधुरी दिक्षित, अमिताभ बच्चन, बाळासाहेब ठाकरे, शिवाजी महाराज यांची चित्रं हुबेहूब वाटतात. जणू काही एखादे पोट्रेट काढूनच जमिनीवर अंथरले आहे. प्रत्येकजण ते बघताना प्रथम हे चित्र आहे की, खरोखरची रांगोळी याची खात्री करून घेणारच. अशा रांगोळ्यांचा आस्वाद घ्यायला विसरु नका. सौंदर्याचा आनंद काय असतो अनुभवयाचा असेल तर रंगावली परिवाराच्या रांगोळ्यांना जरुर भेट द्या. 


Tuesday 18 November 2014

वेड लावलंय प्रो कबड्डीनं ...

प्रो कबड्डीम्हणजेच प्रोफेशनल कबड्डी. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कबड्डीपटू प्रो कबड्डीमध्ये झळकताना दिसतायत. अनेक वर्षांचा इतिहास या खेळाला आहे. राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जात असला तरी क्रिकेट वेड्यांच्या दुनियेत आता तो अस्तित्वासाठी धडपडतोय. अन्य खेळांप्रमाणे या खेळालाही ग्लॅमर मिळावं म्हणून कॉर्पोरेट कंपन्यांनी एकत्र येऊन प्रो कबड्डी स्पर्धा आयोजित केली आणि खेळाडूंची जिद्द आणि रसिक प्रेक्षकांचा उत्साह पाहता कबड्डीची आयपीएल सुरू असल्याचाच भास झाला. 


आयपीएलची मॅच बघताना जो जल्लोष पाहायला मिळतो तसाच जल्लोष मुंबईतल्या NSCI च्या मैदानात पाहायला मिळाला. कबड्डीच्या क्लबमध्ये खेळणारे खेळाडू आणि इतर खेळांमध्ये (Sports) पारंगत असलेल्या खेळाडूंचाही प्रेक्षकांत समावेश होता. संपूर्ण स्टेडियम कबड्डीप्रेमींनी भरलेलं होतं. प्रत्येक टीमला विशिष्टं नावं देण्यात आली होती. यू मुंबाला सपोर्ट करणाऱ्या अनेक प्रेक्षकांचा आवाज स्टेडियममध्ये घुमत होता. सगळ्यात भन्नाट गोष्टं म्हणजे प्रत्येक टीमचं स्वतःचं गाणं होतं. त्यातलं Vizag या टीमचं तेलुगु भाषेतलं गाणं सर्वांनी एन्जॉय केलं. मुंबईच्या टीमसाठी यू मुंबा हे गाणं होतं. पुण्याच्या टीमचं 'पुणेरी फलटण आली रे...' हे गाणंही भाव खाऊन गेलं. पण गाण्यांमुळे एक वेगळाच माहौल तयार झाला होता. कोणत्याही टीमने एखादा गुण पटकावला की त्या टीमचं गाण लावलं जायचं आणि रसिक त्या गाण्यावर ठेका धरायचे. दिमाखात मैदानाशी समरस होणाऱ्या खेळाडूंना पाहताना प्रेक्षकांचा उत्साह क्षणोक्षणी वाढत होता. रंगीबेरंगी लाईट्सचा इफेक्ट ग्लॅमरमध्ये भर घालत होता. 

एकमेकांना सहाय्य करून आपले सात गडी राखण्याचा प्रयत्न या खेळात केला जातो. आपला गडी बाहेर गेला तर त्याला परत आत आणण्यासाठी तेवढ्याच जिद्दीने प्रयत्न केले जात होते. बोनसचे एक-एक गुण मिळवून विरोधी संघाला मागे टाकण्यामध्ये 'यू मुंबा टीम'च्या शब्बीर बापू आघाडीवर होता. 'यू मुंबा' टीमचा कॅप्टन अनुप कुमार यानंही चांगली कामगिरी केली. लेफ्ट टर्न लावणारा 'यू मुंबा टीम'चा जीवा कुमार आणि सांताक्रुझ इथे राहणाऱ्या इशांत यांना दुखापत झाली, परंतु त्याचा परिणाम खेळावर मात्र कुठेच झाला नाही. 


रेडर आणि डिफेन्डर म्हणून आपली कामगिरी बजावणारे खेळाडू जिंकण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होते. आपलीच टीम जिंकावी यासाठी मॅच (Kabaddi Match) बघायला आलेला प्रत्येक जण प्लेयर्सना प्रोत्साहन देत होता. आपल्या प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी बजवावी यासाठी त्या-त्या टीमचे कोच योग्य वेळी टाइम आऊट घेऊन आपल्या संघाला मार्गदर्शन करत होते. सर्वांचंच लक्ष गुणांकडे लागलं होतं. एकेका गुणासाठी खेळाडू जिवाचं रान करत होते. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आशीर्वाद या सगळ्याची सांगड इथे सतत जाणवत होती. सामना अटीतटीचा होत होता त्यामुळे प्रक्षेकांचं आणि खेळाडूंचं टेन्शन वाढतच चाललं होतं. गेम कधी पलटेल याचा काहीच अंदाज नव्हता आणि शेवटी 'यू मुंबा'ने बाजी मारली. या टीमच्या सपोर्टर्सनी स्टेडियम डोक्यावर घेतलं. 


प्रो कबड्डीने प्रेक्षकांना तर समाधान दिलंच शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळूनही अद्याप प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या अनेक डिफेन्डर्स आणि रायडर्सना ग्लॅमरही मिळवून दिलं.