Thursday 9 April 2015


चाळ नावाची वाचाळ वस्ती ....


सुखातला आनंद द्विगुणित करण्यासाठी, तर दु:खाचा भार मिळून वाटून घेण्यासाठीच असतो, हेच जणू चाळीत राहणाऱ्या लोकांचं समीकरण असतं.

काही जुजबी, अपरिचित कुटुंबाचा भार उचलणारी वस्ती म्हणजे चाळ. चाळ म्हणजे एक वेगळीच दुनिया ..... मुक्तपणे जीवनाचा आनंद कुठे लुटता येत असेल तर तो चाळीमध्येच. मनानं श्रीमंत असलेली माणसं जगाच्य़ा कानाकोपऱ्यात कुठे पाहायला मिळत असतील तर ती चाळीत.... चाळीविषयी अनेक गप्पा आपल्या आजूबाजूला ऐकायला मिळतात परंतु नेमकं चाळीमध्ये एवढं असतं तरी काय ? हे चाळीत राहिल्याशिवाय अनुभवताच येणार नाही. गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला चाळीविषयी वाटणारं आकर्षण चाळ सोडून गेल्यावर प्रकर्षानं जाणवतं. अशाच काही आठवणी माझ्या चाळीविषयी.... 


जोगेश्वरीमध्ये प्रसिद्ध असणारी आमची 'बांद्रेकरवाडी' आणि याच बांद्रेकरवाडीच्या कुशीत कित्येक वर्षापासून अस्तित्वात असलेली राव चाळ. एकमेकांच्या कुटूंबाविषयी जाणून घेतल्याशिवाय दिवसाची सुरूवात होत नाही. लवकर उठ रे.... वाजले किती हा सूर सगळ्यांच्याच घरी कमी जास्त स्वरात ऐकायला मिळतो. स्वच्छतेला सर्वाधिक महत्व देणाऱ्या आमच्या चाळीतल्या बायका काही औरच... सकाळी १० वाजेपर्यंत सगळ्यांचेच दरवाजे चकाचक धुतलेले. पूर्वी पाण्यासाठी आमच्या इथे सार्वजनिक नळ होताआता मात्र सगळ्यांच्या घरी एक स्वतंत्र नळ आहे. पाण्याचा फोर्स कमी झाला की लगेच नळ बंद करा ..... किती पाणी वापरणार? यावर आजूबाजूला अनेक खटके उडतात आणि यामध्ये मराठी आणि हिंदी भाषेत शाब्दिक वाद झाले तर त्या भांडणाला एक वेगळीच मज्जा येते. फेरीवाले कुणी आले की त्यांच्यांशी हिंदीत बोलताना आणि विशेषत: बार्गेनिंग करताना सुरू असणारी चढाओढ पाहताना वेगळीच मज्जा येते. उदाहरण द्यायचं झालं तर "क्या भैया इतनासा दिया, मेरे आदमी को पता चलेगा तो मुझे बोंब मारेगा"..... आणि बरंच काही....



फळवाले, भाजीवाले, रद्दीवाले, डबा-बादलीला बूड, पिपाला नळ बसवणारे, चाकू-सुरी-विळीला धार करणारे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रेत्यांची रेलचेल आमच्या चाळीत ठरलेली. त्यामध्ये काही भिकारी आलेच तर त्यांना पैसे देऊन "कितनी बार आते हो"  असा टोला पण आम्ही लगावतो.... स्वयंपाक झाल्यावर तुम्ही काय केलं? आपल्या घरातली भाजी आवडत नसेल तर तेवढ्याच आपुलकीने बाजुच्या काकूंकडे हक्कानं जायचं आणि त्यांना विचारायचं आणि ते हक्काचं घर म्हणजे आमच्या शेजारच्या 'यादव काकी'.  त्यांचा स्वयंपाक कोल्हापूरी पद्धतीचा असल्यामुळे त्याचं जेवण मला फार आवडतं. मग कधी आमच्या घरी आवडता पदार्थ नसेल तर त्यांच्याकडे असणारी भाजी हक्कानं मागायची आणि त्यांच्या जेवणाचं कौतुक करायचं. ही आपुलकी कदाचित गगनचुंबी इमारतीत मिळणं अशक्यच. 



आमच्या चाळीतली घरं समोरासमोर असल्यामुळे एकमेकांच्या घरांवर लक्ष असायचं. त्यामुळे कुठे बाहेर जायचं असेल तर तेवढ्याचं हक्कानं आणि विश्वासाने समोरच्या काकूंना सांगायचं जरा बाहेर जाऊन येतो, घराकडे लक्ष असू दे. या साऱ्या गोष्टीमुळे आमच्या चाळीतली माणसं अधिक कुटूंबासारखी वाटतात. जगण्याची शैली, वागण्याची तऱ्हा आणि प्रत्येकाचा स्वभाव यामुळे आमच्या चाळीला एक वेगळाच हुरूप आला. एकमेकांकडे ऊठबस रात्री बारा वाजेपर्यंत सरायची नाही. 



आमचा जन्म, बालपण, कर्तबगारी कौतुकाने पाहणाऱ्या या चाळीने इथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या स्वभावात स्वत:चं बीज पेरलयं. ज्या चाळीत आम्ही वर्षानुवर्षें राहिलो, बागडलो, वाढलो ती चाळ, चाळीतल्या प्रत्येक माणसाने आपापल्या स्वभावाने सजीव केली. साधारणत: तीस घरांच्या कुटूंबाची आमची चाळ. नाना जातीची बिऱ्हाडं या चाळीत सुखानं नांदतायतं. प्रत्येकाच्या नावात, गावात, जातीत फरक असला तरी आपलेपणाची भावना सगळ्यांमध्ये समान आहे.  आमची चाळ आणि आम्ही अगदी सामान्य. मिळूनमिसळून जगताना माणूस म्हणून, शेजारी म्हणून जगण्याचे धडे मात्र प्रत्येकाने इथेच गिरवले. 



जानेवारी महिन्यामध्ये चाळीमधली बच्चे कंपनी कोणत्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतील तर ती आमच्या चाळीतल्या 'सत्यनारायण पूजेची'. रात्रभर बाहेर मज्जा करायची,  एकमेकांची नक्कल करणं हे तर आमच्या रक्तातच भिनलेलं असायचं.  चाळीतल्या बायका एकत्र येऊन लहान मुलांच्या आनंदात सामील होतात.  गप्पा, मज्जा मस्करी यामध्ये  पहाट कधी व्हायची हे आम्हांला समजतंच नाही. अशा अनेक गंमतीदार आठवणींनी आमच्या मनात एक वेगळं घर करुन ठेवलंय...



कालौघात प्रत्येक जण कामानिमित्त, गरजेनिमित्त चाळीबाहेर पडले... आपलं बिऱ्हाडं गुंडाळताना प्रत्येकानं चाळीतल्या आठवणींची शिदोरी सोबत नेलीच होती. काळानुसार आमच्या चाळीसुद्धा आजकाल बदलू लागल्या आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली इथं बिल्डिंग उभ्या राहणार आहेत. त्याकरता बिल्डरांकडून खेळल्या जाणाऱ्या राजकारणामुळे इथलं वातावरण ढवळून निघतयं. सारी काही समीकरणं बदलत आहेत. पैशांच्या लोभापायी माणसं दुरावली जात आहेत. उद्या भविष्यात अशा हजारो चाळी पुर्नविकासाच्या नावाखाली पडून त्या जागी टॉवर दिसतील पण "चाळ नावाची वाचाळ संस्कृती" प्रत्येकाच्या मनात घर करून राहू दे असंच नेहमी मला वाटत असतं.



चाळीतल्या त्या एका खोलीत मिळणारा आनंद अवर्णनीय आहे.
एकत्र आणि विभक्त कुटुंब पद्धतीतल्या फरकासारखंच आहे !

Wednesday 18 February 2015


चिंताग्रस्त शेतकरी आत्महत्येची वाट शोधतोय ....

भारत हा कृषीप्रधान देश आहे किंवा शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलं जातं तेव्हा नेमकं काय अपेक्षित असतं? कौतुक की चेष्ठा? भारतीय शेतकऱ्यांची क्रूर थट्टा कशी केली जाते हे ऐकूया त्याच्याच शब्दांत...


मी शेतकरी बोलतोय... दु:खी कष्टी, राज्यकर्त्यांनी छळलेला, निसर्गाच्या लहरीपणामुळे पोळलेला, निराश, चिंतीत, वैफल्यग्रस्त आणि आत्महत्येला परावृत्त झालेला... हो मी शेतकरी बोलतोय... माझ्यासाठी बोलणारा कोणी नाही आणि कुणी माझा वालीही नाही... म्हणून मी स्वतःच माझ्याबद्दल बोलतोय. एक चिंताग्रस्त शेतकरी आत्महत्येची वाट शोधतोय... आमच्याकडे शेतीसाठी पाण्याची सोय नाही. शेती निसर्गाच्या लहरीवर विसंबून आहे. कर्जबाजारीपणामुळे आम्ही त्रस्त आहोत. बी-बियाण्याचा प्रश्‍न मोठा आहे, चांगली बियाणं मिळत नाहीत मिळालीच तर ब्लॅक मार्केटमधून अव्वांच्या सव्वा रुपयांनी खरेदी करावी लागतात. खतांचा तर काळाबाजारच आहे. पिकांना, फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. आमच्या कष्टाने शेतीची उत्पादनक्षमता तर वाढली. मात्र, आमचं उत्पन्न काही वाढलं नाही. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भुकेला देश अशी भारताची ओळख होती. मात्र, शेतीच्या माध्यमातून आम्हीच देशाला सधन केलं, पण.. पण आमच्या हाती काहीच लागलं नाही...


आम्ही काय करतो? आम्ही ओरडतो; पण कोणीही ऐकत नाही. अधिकारी थातूरमातूर खुलासे 
करतात. कानांवर हात ठेवतात. सरळ हात झटकतात. भ्रष्टाचार करतात मग आम्ही आंदोलन करतो, त्याशिवाय दुसरा उपायच नसतो. लोकप्रतिनिधी ते फक्त मतं मागण्यापुरते आणि निवडून येण्यासाठीच आहेत. फार थोडे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी जागरूक आहेत. शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने कुणीच वाली नाही. शेतीमालाचे भाव  व्यापारी मुद्दाम पाडतात. व्यापाऱ्यांविरुद्ध आंदोलनं झाली, आता तुम्हीच आम्हांला वाचवा. अधिकाऱ्यांना सूचना द्या.

अर्थव्यवस्थेचा दिवाळीचा सणम्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या कण्यापेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्व खावुन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या अर्थव्यवस्थेच्या कण्यालामिळतांना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
आणि.. आणि जर का हे खरं असेल तर शेतकर्‍याला देशाचा राजाम्हणणं म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टाच करण्यासारखं आहे. या देशात जे काही लोक शेतीवर उपजिविका करतात त्याच शेतकऱ्याला आज शेतीमुळेच आत्महत्याही करावी लागतेय. 

आमच्या आत्महत्या वाढल्या, राज्यकर्ते आणखीणच एक गुर्हळ ठेवून गेले... विश्लेषकांना बुद्धीचं लालित्य  पाजळयाला बळ देऊन  गेले... आमचं जगणं यातच हरवलं... गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या आयुष्यात अनेक वादळं निर्माण झाली. आमचं जीवन एका वाटेवरच येऊन थाबलं.मातीत पहिलेलं स्वप्नं मातीतच  गाडलं गेलं....


गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ या साऱ्या संकंटापुढे माणूस निसर्गापुढे किती क्षुलल्क आहे हे अनेकवेळा दाखवून दिलंय. पण शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान प्रचंड मोठं आहे. आता... आता गरज आहे ती प्रशासनानं माणूसकी दाखवण्याची...

नैसर्गिक संकंटामुळे बळीराजा पुरता उद्धवस्त झाला. पाच सहा लाख हेक्टरवरील पिकं अक्षरक्ष: आडवी झाली. अवकाळी पावसामुळे अनेक फळबागा उद्धवस्त झाल्या. पिकांचं अतोनात नुकसान झालं, मात्र, मात्र  सरकारी यंत्रणा पंचनाम्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहतेय. पण अजून पदरात दमडीही पडलेली नाही. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेंचं कारण पुढे करून गारपीटग्रस्तांच्या हातावर फक्त ३७ रुपयांचा चेक टेकवला. सर्वाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्याच बाबतीत नको ती नियमावल्ली का असावी? हा सगळा कारभार पाहिल्यानंतर सरकारचा ढोंगी कारभार शेतकऱ्य़ांची थट्टा कशी करतो याची प्रचीती येते. उन्हांतान्हांत घाम गाळणाऱ्या या शेतकऱ्यांना कवडीमोडालाचीही किंमत जर या देशात मिळत नसेल तर माझा देश सुजलाम सुफलाम म्हणण्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. पण.. पण आमची राजकारणी मंडळी निवडणूकीच्या धुळवडीत मश्गूल झालीये. खुर्चीच्या खेळात मग्न असलेल्या नेते मंडळींना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायलाही वेळ नाही की मदतीचा हात देण्याची दानतही नाही.

अशा नेते मंडळींना एकच विनंती...
 अरे बाबांनो, थोडसं माणूसकीनं वागा, उद्धवस्त बळीराजाला मदत करा, 
त्याला आधार द्या... 



Monday 16 February 2015

मैत्री एक आठवण... 
कुणीतरी आपलं असल्याची जाणीव...

(काही आठवणी सांगण्यापेक्षा लिखित स्वरुपाच्या असल्या की मनात कायमचं स्थान करुन राहतात आणि म्हणूनच तुझ्याविषयी वाटणारी आपुलकी, काही आठवणी खास तुझ्या वाढदिवसासाठी राखून ठेवल्या... कदाचित तुझ्यासाठी हे कधीही न विसरणारं गिफ्ट असू शकतं.)

आयुष्यात अनेक जण काही ना काहीतरी देऊन जातात... माझ्या आयुष्यात तसं पाहायला गेलं तर मित्र-मैत्रणींची कमतरता नाही पण या सर्व मित्र-मैत्रिणींच्या यादीमध्ये सगळ्यात टॉपला कुणाचं नाव येत असेल तर ते तुझं... (स्वप्ना लांडगे) आयुष्यात सगळेच जण मैत्री करतात, पण मैत्रीचं हे नातं टिकवायचं कसं याचं गणित तुला जास्त चांगलं जमतं. स्वभावाने जरा चिडकी असल्यामुळे सगळेच जण मुद्दाम माझी मस्करी करतात. मग ते शाळेतले Friends असो कॉलेजमधले किंवा आता ऑफिसमधले... मलाही तुमची मस्करी आपुलकीची वाटते. या सगळ्या गोष्टी मैत्रीमध्येच अनुभवयाला मिळतात. आपल्या वाईट प्रसंगी जे आपल्यासोबत असतात तेच आपले मित्र असतात याचं उदाहरण तूच आहेस. प्रेमापेक्षा मैत्रीचचं नातं अधिक घट्ट असतं याची जाणीव मला पदोपदी झाली. 

आयुष्यात अनेकजण येतात आणि जातात पण मैत्री आपली साथ कधीच सोडत नाही याचं जिवंत उदाहरण म्हणजे स्वप्ना लांडगे. माझ्या आयुष्यात अनेक वादळं आली ते पेलण्याचं सामर्थ्य माझ्यात नव्हतं परंतु Positive विचार करण्याची शक्ती तूच मला दिलीस. माझ्या सुख-दु:खात तू माझी साथ कधीच सोडली नाहीस. फक्त गेल्या वर्षी तू माझ्या वाढदिवसाला नव्हतीस याचं मला वाईट वाटलं पण माझ्या दु:खात तूच माझ्या पाठीशी होतीस ही आठवण मी कधीच विसरणार नाही.

तशी तुझी माझी  मैत्री अकरावी –बारावीपासूनची... एकत्र कॉलेजला जाणं, एकत्र येणं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पक्कया मैत्रिणी कधी झालो काही कळलचं नाही. त्या दिवसानंतर आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी आपण एकेकांशी शेअर केल्या. महत्त्वाचे निर्णय घेतानाही आपण एकमेकांना विचारायचो. कधी तुला यायला उशीर झाला की तुला ओरडायचे, वैतागायचे पण त्यामध्येही आपुलकीची भावना होती. तुझ्या वस्तू सांभाळताना स्पेशली जेव्हा तुझी आई मला कॉल करुन एखादी जबाबदारी द्यायच्या तेव्हा एकमेकांवरचा हक्क अधिक जाणवायचा. तेव्हापासूनच आपल्या मैत्रीच्या नात्यात आपलेपणा आणि हक्क या दोन्ही गोष्टी मनात घर करुन राहिल्या. माझ्या सुखासाठी तू फार काही केलंस, पण माझं सुख हे क्षणभंगुर होतं त्याला तू तरी काय करणार? प्रेम करणारे साथ सोडून गेले पण तू आजही तिथेच आहेस. माझ्या वाईट प्रसंगी तू मला धीर दिलास. खऱ्या अर्थानं माझं सांत्वन केलंस, ही गोष्ट आयुष्यात मी कधीच विसरणार नाही. आज मी जिवंत दिसतेय ती फक्त तुझ्यामुळे. जेव्हा जेव्हा माझ्या मनात वाईट विचार यायचा, माहित नाही पटकन तुझी आठवण यायची आणि रडत रडत माझं दु:ख तुला सांगून मोकळे व्हायचे. घरातल्यांनी मला खूप सावरलं, पण एक मैत्रिण म्हणून तू माझी साथ शेवटपर्यंत सोडली नाहीस. आजच्या या स्वार्थी युगात मोजकेच असे Friend आयुष्यात भेटतात आणि आयुष्यभर साथ देतात त्यापैकी तू एक....

बऱ्याचशा गोष्टी आपण एकमेकांशी बोललो पण आपली एकही गोष्ट बाहेर कुठे लिक झाली नाही याचा मला अभिमान वाटतो. आजकाल मी कशी वागते माझं मलाच माहित नाही. तू काही गोष्टी समजावून थकलीस, पण मी माझी तत्वं कशी काय विसरू शकते हेच मला कळत नाही.... तूला कितीही समजावण्याचा कंटाळा आला असला तरी एक-दोनदा समजावण्याचा प्रयत्न तू नक्की करतेस. ऐकली तर ऐकली.... असा तुझा समज असतो. सगळ्यात आवडलेलं तुझं मत म्हणजे जागृती तू सुखी राहणार असशील, तर मला हे नातं मंजूर आहे. तुझ्याशी ती गोष्ट शेअर केली आणि तुझा रिप्लाय ऐकल्यावर दोन सेकंद माझं मलाच कळलं नाही. कदाचित मी सहन केलेला त्रास तू जवळून पाहिलास, तुला माझी काळजी वाटत होती आणि तुझ्यासाठी मी महत्त्वाचे होते याची जाणीव तुझ्या रिप्लायमधून पुन्हा एकदा तू करून दिलीस. एकदा नको जाऊ असं बजावलं होतंस त्यावेळी एका बाजूला खूप छान वाटलं कारण हक्काने तू मला ते बजावत होतीस पण एका बाजूला माझं मन त्या ठिकाणी खेचून नेत होतं. मनाची द्विधा अवस्था झाली होती शेवटी तूच येऊन मला समजवलंस आणि परमिशनही दिलीस. माझं भलं व्हावं यासाठी माझी आई, दादा झटत असतात पण त्यांच्या यादीत तुझंही नाव तितक्याच हक्कानं पुढं येतं. 

आज जे काही जीवन जगतेय त्यात तुझं प्रेम, आपुलकी याचा मोलाचा वाटा आहे. खूप काही चांगल्या गोष्टी आपण एकमेकांना सांगू शकत नाही. आभार मानायचे राहून जातात पण मैत्रीत कसले आभार मानायचे... पण काही गोष्टी लिहायला लागलो की अचानक सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि डोळे पाण्याने भरुन येतात.

माझ्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी खास वेळ काढावासा वाटला. खरंतर कधीपासून तुझ्याबद्दल माझ्या मनात असलेली आपुलकी सांगावीशी वाटत होती, पण त्याचा शुभारंभ आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी झाला. याचा जास्त आनंद मला होतोय. माझ्या भावना माझ्या शब्दांमार्फत तुझ्यापर्यंत पोहचतील अशी आशा बाळगते.

.... आणि हो असं कुणीतरी आपल्या वाढदिवशी आपलं कौतुक करणारं पत्र लिहावं हे फार दुर्मिळच असेल. कदाचित तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यातलं अनोखं गिफ्टही असेल असं मला वाटतं. बोलण्यातून कधी कधी प्रेम व्यक्तचं करता येत नाही आणि तसं शक्य झालं तर मी बोलण्यापेक्षा जास्त रडत बसेन आणि मला हसवण्यासाठी तू एखादा जोक क्रॅक करशील म्हणून आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझ्या आयुष्यात कायम लक्षात राहील असं अनोखं गिफ्ट.

''मैत्री माझी पुसू नकोस आणि मला कधी विसरू नकोस...
माझ्या मैत्रीची जागा कुणाला देऊ नकोस...

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....

माझ्या मैत्रिणीला उज्जवल आयुष्य दे ...  हीच देवाचरणी प्रार्थना...



Friday 13 February 2015

लव्हस्टोरी तुझी माझी....

आजचा व्हॅलेंटाइन्सचा दिवस म्हणजे सगळ्याच प्रेमयुगुलांचा खास दिवस... या दिवशी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रेम व्यक्त करत असतो... खरंतर प्रेमकथा या महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाचं असतं, ‘ते तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता... मात्र असं असलं तरी प्रत्येकजण या दिवशी थोड्या वेगळ्या अंगाने विचार करतात... आणि म्हणूनच माझ्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करुन देण्यासाठी आज लिखित स्वरुपात आपली लव्हस्टोरी मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला... आतापर्यंत तू मला खूप अनमोल गिफ्टस दिलीस, ज्याची तुलना करणं अशक्यच... पण गिफ्ट हे गिफ्ट असतं असं तू नेहमीच म्हणतोस... म्हणूनच काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे अनोखं गिफ्ट तुझ्यासाठी ...

'फेसबुक'वाली लव्हस्टोरी ....

फेसबुक हा आपल्या नात्यातला महत्त्वाचा दुवा ठरला... फेसबुकवर पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट झाल्यानंतर हाय-हॅलो आणि अॅप्रिसिएशन करणारे तुझे मेसेज त्यावर असणारा माझा रिप्लाय आणि बरंच काही.... पण या संवादाचं रुपांतर आय लव्ह यू मध्ये होईल असा विचार त्या क्षणी दोघांच्यांही मनात आला नसेल... अर्थात मला तरी असं वाटलं नव्हतं... तुझं माहित नाही कदाचित पटवण्यासाठीच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असावी... पण तुझ्या बोलण्यामधून पटवण्याचा गाभितार्थ कधीच जाणवला नाही... फेसबुक फेंण्ड्स मग त्यातले काही ओळखीचे असतात तर काही हाय-बायवाले सुद्दा असतात. मुलींकडे मोबाईल नंबर मागून माती खाण्याचं काम फेसबुकवर हमखास केलंच जातं आणि त्यातूनच बऱ्याच मुलांच्या वृत्तीचा थांगपत्ता लागतो... पण तशी माती तू पण खाल्लीस पण तुझ्या बाबतीत असं कधीच मनात आलं नाही जे इतरांच्या बाबतीत आलं... आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझा आवाज... तुझ्या आवाजाने आणि तुझ्या ट्रान्सपरन्ट वृत्तीमुळे मी तुझी कधी झाले समजलंच नाही... एके रात्री काय ते फेसबुकवर बोललो आणि लगेच दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता कॉल करुन तुला माझ्याशी बोलावसं वाटलं... आपली ओळख गडदसुद्धा झाली नव्हती तरी एवढा बिनधास्तपणा तुझ्यात कुठून आला, कुणास ठाऊक.... पण तेव्हा अनाहूतपणे केलेला कॉल आणि माझ्या मनाची झालेली बेचैन अस्वस्था आजही लक्षात आहे... आपल्या प्रेमाच्या नात्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मार्क झुकेरबर्गचा मोलाचा वाटा... आज त्याच्यामुळेच दोन अनोळखी माणसांची मनं एकत्र जुळली.... 

 मैत्री तुझी माझी ....


आपली मैत्री वाढत गेली पण आपण प्रेमाच्या गोष्टींमध्ये रमलो नाही.. रमायला लागलो ते दसऱ्याच्या पाच-सहा दिवसांपूर्वी... तुला दसऱ्याच्याच दिवशी भेटेन असा अट्टाहास होता माझा.... आणि तुही कधी भेटण्याबाबत जबरदस्ती केली नाहीस ... त्यामुळे तुझ्याबद्दलचा विश्वास अधिकच दृढ होत गेला... पण असा सर्वेश दारु पित असेल असा विचारही कधी मनाला शिवला नाही... त्यानंतर मी केलेला तमाशा, समजत नव्हतं मी करतेय ते बरोबर आहे की चूक पण त्यावेळी कुठेतरी आपलेपणाची जाणीव होत होती... खूप काही बोलले... पण सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे त्याचा  काडीमात्र फरक आजही पडला नाही... दिवसातून दुपारी आणि संध्याकाळी असं दोनदा पाऊण तास माझ्यासाठी विप्रोमध्ये वेळ काढायचास त्यावेळी इतका वेळ माझ्यासाठी कसा काय काढत असशील असा प्रश्न कधीच निर्माण झाला नाही... पण जेव्हा मी ऑफिसला जायला लागले ऑफिस हे काय असतं समजायला लागलं आणि बऱ्याच प्रश्नांचा उलगडा आपोआपच होत गेला... आज पाठी वळून बघताना डोळ्यातून चटकन पाणी येतं... परिस्थितीचा परामर्श गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलने दाखवून दिला... कदाचित आज तू गर्जा महाराष्ट्राचे आभार मानत असशील...  झोप काय असते हे या न्यूज चॅनेलने दाखवून दिलं... खरंच आज समजतं कामावरुन थकून येणाऱ्या माणसाला कधीतरी दमल्यानंतर लवकर झोपावसं वाटतं... त्यावेळी मी तुझ्यावर रागवायचे पण आज समजतंय सगळं.... पण विशेष म्हणजे तू कधीच माझ्यावर रागावला नाहीस...  

निमित्त दसऱ्याचं ....

त्या दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने मी तुझ्या प्रेमात पडले होते... पण तु सुद्धा काही विचारत नव्हतास आणि मी तरी कसं सांगणार? दोघंही दसऱ्याच्या दिवसाची वाट पाहत होतो... आणि तो दिवस उजाडला....
सकाळपासून excitement तर होती त्यात तुझ्या आईचा आवाज पहिल्यांदाच फोनवर ऐकला... संध्याकाळी निघताना वेगळंच टेंन्शन आलं होतं... आयुष्यात पहिल्यांदा कुणा एका मित्राला भेटायला जाणार होते ते पण फेसबुक फ्रेंण्डला... सॉलिड बिनधास्त झाले होते पण एकटं भेटण्याएवढे बिनधास्त झाले नव्हते... तू आलास, तुला जरा उशीरच झाला होता... आम्ही दोघी वाट बघत होतो... स्वप्ना मला धीर देत होती, त्यात मी तिला विचारतेय अगं हाच आहे ना तो? मला जरा वेगळा वाटतोय... मी असं म्हणटल्यावर जरा ती पण घाबरली... नंतर भे... अशी मला शिवी देऊन तोच आहे तो असं बोलून जी काही माझी समजूत काढली ती खरंच हास्यास्पद आहे... मग काय तोंडात मारल्यासारखं गप्प झाले आणि स्वत:ला सावरलं... तुझ्याकडे बघण्याची तर हिम्मतच होत नव्हती.. आणि त्यात तू आणलेलं गिफ्ट हे माझ्यासाठी विचारापलिकडचं होतं... बऱ्यापैकी बोललो... तू पण जरा गांगरुनच गेला होतास पण ते तू दाखवलं नाही... पूर्णपणे ओळखलं होतं तुला... मी हसावं, बोलावं यासाठी तुम्ही ज्याप्रकारे माझी शाळा घेत होतात आजही आठवलं तरी अगदी काल घडल्यासारखंच वाटतंय... हा सगळा प्रकार माझ्यासाठी नवखा होता... तुझ्या बोलण्यातून काही हिंट्सही मिळत होत्या... घरी आल्यानंतर तुझा आलेला कॉल... तू माझ्याबद्दल व्यक्त केलेलं तुझं मत, माझ्या साडीबद्दल आणि एकंदर सगळ्याच बाबतीत निर्माण झालेलं रोमॅन्टिक वातावरण आणि बरचं काही...

श्वास संगीत झाले जुळता जुळता...


दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने मी तुझ्या प्रेमात बुडाले... आपलं प्रपोज बाहेर कुणाला सांगितलं तर हसतील... आणि त्या दिवशी शिर्डीला जाताना तुझ्या गालावर किस दिली नाही म्हणून तुझ्या पायाला चटका लागला... आजही त्या गोष्टीचं वाईट वाटतंय... काश... दिली असती किस तर कदाचित चटका लागला नसता आणि पायावर ती खूणही राहिली नसती याची खंत आजही मला वाटतेय... प्रेम करणं म्हणजे फक्त फोनवर बोलणं नसतं तर ते व्यक्तही करावं लागतं याचा उलगडा छोट्या मोठ्या प्रकरणावरुन होत गेला... खुलेआम फिरायचं म्हणजे पहिला विचार मनात यायचा तो म्हणजे दादाचा... ही एवढी घाबरते तर पुढे कसं प्रेम टिकवणार असा सवाल निर्माण झाला आणि तो सवाल तसं बघायला गेलं तर वॅलिडसुद्धा होता... आणि जेव्हा समजलं त्या दिवसापासून या प्रश्नाला पूर्णविराम द्यायचं ठरवलं... माझ्यासाठी जास्त दारु पिण्याचेही तू कष्ट घेतले होतेस मग इतकं माझ्यासाठी केल्यानंतर प्रेमात पडलेला माणूस जेवढा बिनधास्त होतो तसंच काहीसं झालं आणि अगदी मनमोकळेपणाने तुझ्यासोबत फिरायला लागले...

गोड नातं हे जन्मांतरीचं ....

तुझ्या बर्डेच्या दिवशी तुला पहिलं गिफ्ट देण्यासाठी शिवसागर गाठलं आणि कॉम्प्रोमाईज करण्यासाठी सुद्धा... त्यानंतर आपला पहिला लव्ह स्पॉट म्हणजे छोटा काश्मिर... त्या ठिकाणी गेल्यानंतर एक प्रकारची भीती तर वाटत होती पण माझ्यासोबत तुझी असलेली साथ मला आणखी धीर देत होती... त्यानंतर झाडाखाली बसून रंगवलेली स्वप्नं आणि बरंच काही... कालांतराने छोटा काश्मिर आपलं दुसरं घर झालं होतं... माझ्या वाढदिवसाला तू दिलेला महागडा ड्रेस अर्थात तुझी सगळी गिफ्ट्स भारी आणि अनमोल असतातच त्यात काही वादच नाही... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझी आई इथे नव्हती पण तुझ्या आईने पहिल्यांदा फोनवरुन मला दिलेल्या शुभेच्छा आजही लक्षात आहेत... एकंदर ४ नोव्हेंबरपासून २४ डिसेंबरपर्यंत आपल्या रिलेशनमध्ये कोणत्याच प्रकारचा तणाव नव्हता... ४४ दिवसांचा सुखद प्रेमप्रवास अविरतपणे चालू होता...

तुझ्याविना....

माझ्या आयुष्यातल्या पहिल्याच लव्ह स्पॉटवर माझी ताटतूट होईल असं कधीच वाटलं नव्हतं... त्या दिवसापासून पुन्हा कधी त्या ठिकाणी जावसंच वाटलं नाही त्यामागचं कारण हेच... आपलं प्रेम आपल्याला कसं परकं करु शकतो याचं जिवंत उदाहरण आपणंच होतो... माझ्यासाठी अनेक गोष्टी तुला सहन कराव्या लागल्या... तू ज्या पद्धतीने आपलं प्रकरण हँडल करतोयस ते खरंच वाखणण्याजोगं आहे... काही वर्षभरामध्ये आपली झालेली ताटातूट... घरातल्यांनी दिलेल्या शपथा आणि बरचं काही... पण तरी आपल्या प्रेमाने अनेकदा आपल्याला जवळ आणलं... सर्वेश आणि जागृतीचं प्रेम कायम राहिलं... पण किती दिवस असेच काढणार असे अनेक सवाल माझ्या मनात निर्माण झाले... त्यामुळे बऱ्याचदां फार तुझ्याशी कठोरही वागले... बऱ्याचदा लांब राहण्याचा प्रयत्नही केला... या आयुष्यात तर तुला विसरु शकणार नव्हते... तसा प्रयत्न करुनही काही फायदा नव्हता... पण दुसरा पर्यायही नव्हता... तुझ्याविना माझ्या आयुष्याला काहीच अर्थ राहिला नव्हता... आशा सोडली होती... आपलं दु:ख मनात ठेवून आनंदी कसं राहायचं आणि त्रास होऊ नये म्हणून एक वाईट स्वप्न होतं अशी समजूत काढायची आणि रात्री रडत झोपायचं... या पलीकडे काहीच जगण्याला अर्थ नव्हता... बिझी राहून आठवणी पुसता येत नव्हत्या... तुझी अवस्था काही वेगळी नसणार तू माझ्यासारखं बोलला नाहीस तरी तुझं माझ्यावर असणारं प्रेम मला नेहमी जाणवत होतं पण नुसतं प्रेम करुन फायदा नव्हता... (आता फायद्यासाठी प्रेम करतात हा शहाणपणा मनात आणू नकोस....) वाढदिवसाच्या निमित्ताने परत एकत्र येऊ असं वाटत होतं पण विश्वास नव्हता... आशा सोडली होती... स्वत:चा राग शांत करण्यासाठी आणि विसरण्यासाठी तुझा राग करायला लागले होते... व्हॉट्स अॅपवर मेसेज करताना नेहमीच मनातली चीड बाहेर काढली... आठवणी मिटवण्याचा प्रयत्न केला पण ते कधीच शक्य होणार नाही हे माहित होतं... पण तरीही ...

मुस्कुराने की वजह तुम हो.... 

तू माझ्या आयुष्यात असणं म्हणजे दुसरं कोणतंच सुख नाही... हे तुला सुद्धा माहित आहे... आज जे काही मी हसून खेळून राहतेय त्याच कारण म्हणजे तुझी मला असणारी साथ... तुझ्यासारखा मुलगा मला भेटूच शकत नाही आणि भेटला तरी मला तो नकोय... मला माझाचं सर्वेश हवाय... आजही तुझ्यासाठी काही करायला तयार आहे... तीन वर्षभरात देवासमोर उभं राहिल्यानंतर आजही आपल्य़ा रिलेशनसाठी केलेली प्रार्थना कायमची अंगवळणी पडलीये... देवावर असणारी श्रद्धा म्हणून काही मागायचं झालं तर तुझी मागणी पहिल्या क्रमांकावर नेहमीच असते... पण देवावर श्रद्धा ठेवणारे आणि त्याच्यावर प्रेम करणारे त्याच्यासमोर असतात असं म्हणतात... तू माझा देव आहेस सर्वेश.... कधी माझा गुरू तर कधी माझा हक्काचा माणूस... माझ्या आयुष्यात तुझं स्थान खरंच मोलाचं आहे... प्रॉमिस डे च्या दिवशी तुला दिलेलं वचन मी मोडणार नाही याची संपूर्ण जबाबदारी माझी... तुझ्या सुखासाठी काही करेन असं म्हणायला सोपं आहे पण करणं कठीण जरी असलं तरी माझा त्यासाठी कायम प्रयत्न असेल.... तुला पश्चाताप होईल असं माझं कोणतंच वागणं नसेल... तुला आणि तुझ्या कुटूंबाला खुश ठेवणं यातंच मी माझं सुख मानेन.... मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे वाक्य बोलून जरी गुळगुळीत झालं असलं तरी आजही वास्तव परिस्थिती तीच आहे...

एकमेकांविषयी फार काही वाटत असतं पण ते बोलायचं राहून जातं आणि म्हणूनचं आज मला तुझ्याविषयी वाटणाऱ्या भावना माझ्या शब्दांतून व्यक्त केल्या... समजू शकते एवढं वाचणं म्हणजे तुझ्यासाठी संयमाचा उद्रेक असेल...

(अपेक्षा करते की तू वाचताना काही गाळलं नसशील....)

I LOVE YOU SARVESH
फक्त आणि फक्त
तुझी जागृती

Friday 12 December 2014


.... त्या दिवशी आचारा गाव होतं निकामी


बा देवा रामेश्वरा.... तुझ्या हुकूमानुसार आज आचरा गाव आम्ही रिकामं करतोय, सगळ्यांची रखवाली कर आणि वर्षानुवर्षे चालणारी ही प्रथा खरी करुन घे... आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरात दर तीन वर्षांनी असंच गा-हाणं घातलं जातं आणि भक्तांचा होय महाराजा चा स्वर घंटानादासह दणाणू लागतो... गाऱ्हाण्यानंतर श्री रामेश्वर मंदिराची तिन्ही प्रवेशद्वारं बारा पाचाच्या मानकऱ्यांच्या हातानं बंद केली जातात... नगारखान्यातील नगारा दणाणतो... आणि तीन दिवसाच्या गावपळणीसाठी संपूर्ण आचरा गाव वेशीबाहेर जाण्यासाठी सज्ज होतो... 

कोकणात सण-उत्सव आणि प्रथा-परंपरांना मोठं महत्त्व आहे. गैरवशाली परंपरा लाभलेल्या मालवण तालुक्यातील आचरे या गावात शेकडो वर्षाची एक अनोखी प्रथा आजही जोपासली जातेय. दर तीन वर्षानंतर गावपणळणीची कुजबूज कोकणात होते. मार्गशीष महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला रामेश्वराला कौल लावला जातो. देवाचा कौल मिळाल्यानंतर गाव पळणीची तारीख निश्चित होते आणि त्या दिवशी संपूर्ण गावातील समस्त शेतकरी, दुकानदार, व्यावसायिक, मजूर बायका, मुले, गुरं-ढोरांसह गावाच्या वेशी बाहेर पडतात. यावेळी शाळाही भरत नाही. शासकीय कार्यालयांमध्ये ग्रामस्थांचा लवलेशही नसतो.

गावपळणची प्रथा मालवण तालुक्यातील वायगंणी, चिंदर, मुणगे या गावांमध्येही दिसून येते. आचऱ्यातील पारवाडी, कारवणे, देऊळवाडी बाजारपेठ, त्रिंबक पिरावाडी, जामडूल नदी, गाऊळवाडी, भंडारवाडा, हिर्लेवाडी-वायंगणी या गावातील वेशीबाहेर पडणारे काही ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्य करतात तर काहीजण मालवण भगवंत गडाच्या रस्त्यालगत राहुट्या थाटतात. तात्पुरत्या स्वरुपाच्या बांधलेल्या राहुट्या बघितल्यानंतर जणू काही वेगळं गावंच थाटल्यासारखं वाटतं. नोकरी उद्योगाच्या निमित्तानं परगावी जाणारे किंवा मुंबईला असणारी मंडळी तीन वर्षांनी येणाऱ्या या वेगळेपणाची जपणूक करण्यासाठी एकत्र येतात.  

शेकडो वर्षाची परंपरा ग्रामस्थ मोठ्य़ा श्रद्धेनं जोपासत आहेत. तीन दिवस आणि तीन रात्री नंतर बारा पाचाचे मानकरी गाव भरवतात आणि रामेश्वराला कौल लावतात त्या दिवशी  कौल झालाच नाही तर एक दिवस वाढवला जातो त्यानंतर पुन्हा चैथ्या दिवशी कौल दाखवला जातो रामेश्वरानं कौल दिला तर पुन्हा तोफांचा आवाज दणाणतो आणि आचरेवासीय पुन्हा आपल्या गावी परतात.

शेकडो वर्षांपासून चालत आलेली गावपळणीची प्रथा का आणि कशासाठी? याविषय़ी अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र ही गावपळण आपलं वेगळेपण दाखवते हे  मात्र निश्चित.