‘इंजिनिअर’ ते ‘बाबा’
१९५१मध्ये हरयाणातील शेतकरी कुटुंबात जन्माला
आलेला रामपाल आज स्वयंघोषित अध्यात्मिक संत (बाबा) झालाय ... कधी काळी सरकारी
इंजिनिअर असणाऱ्या रामपालला वागणूक योग्य नसल्यानं नोकरी गमवावी लागली... हे
झाल्यावर तरी एखादा शहाणा झाला असता, पण नाही....
याला संत कबीर यांचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला... मग काय इंजिनियर रामपालनं
थेट बाबा रामपाल असा अवतारच धारण केला... आजकाल कुणालाही असाच साक्षात्कार होतो,
मग तो स्वत:ला संत म्हणवून घेतो आणि सुरू होतो सत्संग... किंवा
श्रद्धेचा बाजार... बाबा रामपालनं याच बाजारातून चांगला १०० कोटींचा भरभक्कम मलिदा
जमवला.
हरयाणातल्या बरबालामध्ये १२ एकर परिसरात
रामपाल बाबानं आश्रम थाटला. या आश्रमात भक्तांची तर कमतरताच नव्हती. भक्तांसाठी
खास एसी रुम, लेक्चर देण्यासाठी हॉलमध्ये
मोठ-मोठे एलइडी स्क्रीन्स... रामपाल बाबा BMW, मर्सिडीजशिवाय
कुठे हिंडतही नव्हता... मार्केटिंग कसं करावं याचं अचूक गणित रामपालनं जाणलं आणि
अभियांत्रिकी डोक्याची त्याला जोड दिली. म्हणूनच त्याची स्वत:ची वेबसाइटही
आहे. याच वेबसाइटवरून बाबा रामपाल ग्यान
देत होता. एवढंच नाही, या वेबसाइटवर रामपालचा संत्संगही
लाइव्ह दाखवला जात होता. आजच्या जमान्याला सूट होण्यासाठी या भोंदूबाबाचं फेसबुक,
यू-ट्यूबलाही अकाउंट होतंच. साहजिकच बाबाचे फॅन्सफॉलोअर्सही
भरपूर...
कोणत्याही देवाला मानत नाही, पण बाबा रामपाल स्वत:ला मात्र परमेश्वराचा अवतार समजतो. ध्यान करणाऱ्या
बाबाला त्याचे भक्त दुधानं अंघोळ घालायचे आणि त्याच दुधापासून बनवलेली खीर प्रसाद
म्हणून खायचेही... आर्य समाजाशी संघर्ष करणाऱ्या या बाबावर खुनाचा गुन्हाही आहे.
२००६ मध्ये रामपालच्या समर्थकांनी गावकऱ्यांवर गोळीबार केला त्यात एक महिला ठार
झाली. त्यावेळी तो तुरुंगातही गेला होता. २०१३ मध्ये स्थानिकांसोबत झालेल्या
संघर्षात तिघांना जीव गमवावा लागला. कोर्टाच्या आदेशानंतरही हा बाबा सलग तब्बल ४२
वेळा सुनावणीला गैरहजरच राहिला. अशा या निर्लज्ज बाबा रामपालला ताब्यात घेण्यासाठी
पोलिसांना जिवाचं रान करावं लागलं. पण बिचारे पोलीस तरी काय करणार? ४ हजारांवर सशस्त्र फौजच या बाबाकडे होती. स्वत:च्या सुरक्षेसाठी तयार
केलेल्या राष्ट्रीय समाज सेवा समितीतला (RSSS) जवान आपल्या बाबाचं संरक्षण
करण्यासाठी अत्याधुनिक बंदुकीसह सज्ज असायचा.
बाबा रामपालचे हे कारनामे, कारस्थानं पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकातच जावी. पण मुद्दा असा आहे
की, खून प्रकरणात कोर्टानं वॉरंट बजावल्यावरही हजर न
होणाऱ्या बाबासाठी जीव ओवाळणारे भक्त कसे निर्माण होतायत? हाती
बंदूक घेऊन बाबाला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच थेट फायरिंग करण्याचं
धैर्य त्याचे कमांडो कसं दाखवतायत? हे रक्षक रक्षणाचं कामच
करत होते, असं कुणी म्हणेल. पण, बाबाला
पोलिसांनी नेऊ नये, यासाठी रस्ता अडवणारे भक्तही दिसत होतेच.
ही अंधश्रद्धा कुठून येते? याचं समर्थन कोण कसं करू शकेल?
रामपाल पोलिसांना शरण जाईपर्यंत चार महिला आणि एक दीड वर्षांचं
चिमुकलं बाळ मृत्युमुखी पडलं. हे ऐकल्यावर तर लाजेनं मानच खाली गेली...
बुवाबाजी करून इतरांना टोप्या घालणारे बरेच
बाबा आपण पाहिलेत. पण सशस्त्र कमांडोच बाळगून पोलिसांना विरोध करणारा, थेट कायद्यालाच आव्हान देणारा बाबा रामपाल बहुधा पहिलाच असावा. अखेर हा
बाबा रामपाल गजाआड गेलाय. पण त्याच्या अटकेमुळे हे प्रकरण संपलं, असं म्हणायचं का? सतपाल आश्रमातून इंजिनिअर बाबाला
अटक झाली असली, तरी या अटकेतून अनेक प्रश्न नव्यानं उपस्थित झालेयत.
संत कबीर यांचा अनुयायी म्हणवून घेणाऱ्या
रामपालबाबाची वृत्ती पाहिल्यानंतर खरोखरचं त्यानं कबीर वाचलं असेल का? अशी शंका निर्माण होतेय... आजपर्यंत अनेक भोंदूबाबांची कटकारस्थानं उघडकीस
आली तरीही लोकांना शहाणपण का सूचत नाही? एखाद्या भाविकाची
भक्ती इतकी आंधळी कशी काय असू शकते....?
No comments:
Post a Comment