Friday 13 February 2015

लव्हस्टोरी तुझी माझी....

आजचा व्हॅलेंटाइन्सचा दिवस म्हणजे सगळ्याच प्रेमयुगुलांचा खास दिवस... या दिवशी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रेम व्यक्त करत असतो... खरंतर प्रेमकथा या महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाचं असतं, ‘ते तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता... मात्र असं असलं तरी प्रत्येकजण या दिवशी थोड्या वेगळ्या अंगाने विचार करतात... आणि म्हणूनच माझ्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करुन देण्यासाठी आज लिखित स्वरुपात आपली लव्हस्टोरी मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला... आतापर्यंत तू मला खूप अनमोल गिफ्टस दिलीस, ज्याची तुलना करणं अशक्यच... पण गिफ्ट हे गिफ्ट असतं असं तू नेहमीच म्हणतोस... म्हणूनच काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे अनोखं गिफ्ट तुझ्यासाठी ...

'फेसबुक'वाली लव्हस्टोरी ....

फेसबुक हा आपल्या नात्यातला महत्त्वाचा दुवा ठरला... फेसबुकवर पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट झाल्यानंतर हाय-हॅलो आणि अॅप्रिसिएशन करणारे तुझे मेसेज त्यावर असणारा माझा रिप्लाय आणि बरंच काही.... पण या संवादाचं रुपांतर आय लव्ह यू मध्ये होईल असा विचार त्या क्षणी दोघांच्यांही मनात आला नसेल... अर्थात मला तरी असं वाटलं नव्हतं... तुझं माहित नाही कदाचित पटवण्यासाठीच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असावी... पण तुझ्या बोलण्यामधून पटवण्याचा गाभितार्थ कधीच जाणवला नाही... फेसबुक फेंण्ड्स मग त्यातले काही ओळखीचे असतात तर काही हाय-बायवाले सुद्दा असतात. मुलींकडे मोबाईल नंबर मागून माती खाण्याचं काम फेसबुकवर हमखास केलंच जातं आणि त्यातूनच बऱ्याच मुलांच्या वृत्तीचा थांगपत्ता लागतो... पण तशी माती तू पण खाल्लीस पण तुझ्या बाबतीत असं कधीच मनात आलं नाही जे इतरांच्या बाबतीत आलं... आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझा आवाज... तुझ्या आवाजाने आणि तुझ्या ट्रान्सपरन्ट वृत्तीमुळे मी तुझी कधी झाले समजलंच नाही... एके रात्री काय ते फेसबुकवर बोललो आणि लगेच दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता कॉल करुन तुला माझ्याशी बोलावसं वाटलं... आपली ओळख गडदसुद्धा झाली नव्हती तरी एवढा बिनधास्तपणा तुझ्यात कुठून आला, कुणास ठाऊक.... पण तेव्हा अनाहूतपणे केलेला कॉल आणि माझ्या मनाची झालेली बेचैन अस्वस्था आजही लक्षात आहे... आपल्या प्रेमाच्या नात्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मार्क झुकेरबर्गचा मोलाचा वाटा... आज त्याच्यामुळेच दोन अनोळखी माणसांची मनं एकत्र जुळली.... 

 मैत्री तुझी माझी ....


आपली मैत्री वाढत गेली पण आपण प्रेमाच्या गोष्टींमध्ये रमलो नाही.. रमायला लागलो ते दसऱ्याच्या पाच-सहा दिवसांपूर्वी... तुला दसऱ्याच्याच दिवशी भेटेन असा अट्टाहास होता माझा.... आणि तुही कधी भेटण्याबाबत जबरदस्ती केली नाहीस ... त्यामुळे तुझ्याबद्दलचा विश्वास अधिकच दृढ होत गेला... पण असा सर्वेश दारु पित असेल असा विचारही कधी मनाला शिवला नाही... त्यानंतर मी केलेला तमाशा, समजत नव्हतं मी करतेय ते बरोबर आहे की चूक पण त्यावेळी कुठेतरी आपलेपणाची जाणीव होत होती... खूप काही बोलले... पण सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे त्याचा  काडीमात्र फरक आजही पडला नाही... दिवसातून दुपारी आणि संध्याकाळी असं दोनदा पाऊण तास माझ्यासाठी विप्रोमध्ये वेळ काढायचास त्यावेळी इतका वेळ माझ्यासाठी कसा काय काढत असशील असा प्रश्न कधीच निर्माण झाला नाही... पण जेव्हा मी ऑफिसला जायला लागले ऑफिस हे काय असतं समजायला लागलं आणि बऱ्याच प्रश्नांचा उलगडा आपोआपच होत गेला... आज पाठी वळून बघताना डोळ्यातून चटकन पाणी येतं... परिस्थितीचा परामर्श गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलने दाखवून दिला... कदाचित आज तू गर्जा महाराष्ट्राचे आभार मानत असशील...  झोप काय असते हे या न्यूज चॅनेलने दाखवून दिलं... खरंच आज समजतं कामावरुन थकून येणाऱ्या माणसाला कधीतरी दमल्यानंतर लवकर झोपावसं वाटतं... त्यावेळी मी तुझ्यावर रागवायचे पण आज समजतंय सगळं.... पण विशेष म्हणजे तू कधीच माझ्यावर रागावला नाहीस...  

निमित्त दसऱ्याचं ....

त्या दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने मी तुझ्या प्रेमात पडले होते... पण तु सुद्धा काही विचारत नव्हतास आणि मी तरी कसं सांगणार? दोघंही दसऱ्याच्या दिवसाची वाट पाहत होतो... आणि तो दिवस उजाडला....
सकाळपासून excitement तर होती त्यात तुझ्या आईचा आवाज पहिल्यांदाच फोनवर ऐकला... संध्याकाळी निघताना वेगळंच टेंन्शन आलं होतं... आयुष्यात पहिल्यांदा कुणा एका मित्राला भेटायला जाणार होते ते पण फेसबुक फ्रेंण्डला... सॉलिड बिनधास्त झाले होते पण एकटं भेटण्याएवढे बिनधास्त झाले नव्हते... तू आलास, तुला जरा उशीरच झाला होता... आम्ही दोघी वाट बघत होतो... स्वप्ना मला धीर देत होती, त्यात मी तिला विचारतेय अगं हाच आहे ना तो? मला जरा वेगळा वाटतोय... मी असं म्हणटल्यावर जरा ती पण घाबरली... नंतर भे... अशी मला शिवी देऊन तोच आहे तो असं बोलून जी काही माझी समजूत काढली ती खरंच हास्यास्पद आहे... मग काय तोंडात मारल्यासारखं गप्प झाले आणि स्वत:ला सावरलं... तुझ्याकडे बघण्याची तर हिम्मतच होत नव्हती.. आणि त्यात तू आणलेलं गिफ्ट हे माझ्यासाठी विचारापलिकडचं होतं... बऱ्यापैकी बोललो... तू पण जरा गांगरुनच गेला होतास पण ते तू दाखवलं नाही... पूर्णपणे ओळखलं होतं तुला... मी हसावं, बोलावं यासाठी तुम्ही ज्याप्रकारे माझी शाळा घेत होतात आजही आठवलं तरी अगदी काल घडल्यासारखंच वाटतंय... हा सगळा प्रकार माझ्यासाठी नवखा होता... तुझ्या बोलण्यातून काही हिंट्सही मिळत होत्या... घरी आल्यानंतर तुझा आलेला कॉल... तू माझ्याबद्दल व्यक्त केलेलं तुझं मत, माझ्या साडीबद्दल आणि एकंदर सगळ्याच बाबतीत निर्माण झालेलं रोमॅन्टिक वातावरण आणि बरचं काही...

श्वास संगीत झाले जुळता जुळता...


दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने मी तुझ्या प्रेमात बुडाले... आपलं प्रपोज बाहेर कुणाला सांगितलं तर हसतील... आणि त्या दिवशी शिर्डीला जाताना तुझ्या गालावर किस दिली नाही म्हणून तुझ्या पायाला चटका लागला... आजही त्या गोष्टीचं वाईट वाटतंय... काश... दिली असती किस तर कदाचित चटका लागला नसता आणि पायावर ती खूणही राहिली नसती याची खंत आजही मला वाटतेय... प्रेम करणं म्हणजे फक्त फोनवर बोलणं नसतं तर ते व्यक्तही करावं लागतं याचा उलगडा छोट्या मोठ्या प्रकरणावरुन होत गेला... खुलेआम फिरायचं म्हणजे पहिला विचार मनात यायचा तो म्हणजे दादाचा... ही एवढी घाबरते तर पुढे कसं प्रेम टिकवणार असा सवाल निर्माण झाला आणि तो सवाल तसं बघायला गेलं तर वॅलिडसुद्धा होता... आणि जेव्हा समजलं त्या दिवसापासून या प्रश्नाला पूर्णविराम द्यायचं ठरवलं... माझ्यासाठी जास्त दारु पिण्याचेही तू कष्ट घेतले होतेस मग इतकं माझ्यासाठी केल्यानंतर प्रेमात पडलेला माणूस जेवढा बिनधास्त होतो तसंच काहीसं झालं आणि अगदी मनमोकळेपणाने तुझ्यासोबत फिरायला लागले...

गोड नातं हे जन्मांतरीचं ....

तुझ्या बर्डेच्या दिवशी तुला पहिलं गिफ्ट देण्यासाठी शिवसागर गाठलं आणि कॉम्प्रोमाईज करण्यासाठी सुद्धा... त्यानंतर आपला पहिला लव्ह स्पॉट म्हणजे छोटा काश्मिर... त्या ठिकाणी गेल्यानंतर एक प्रकारची भीती तर वाटत होती पण माझ्यासोबत तुझी असलेली साथ मला आणखी धीर देत होती... त्यानंतर झाडाखाली बसून रंगवलेली स्वप्नं आणि बरंच काही... कालांतराने छोटा काश्मिर आपलं दुसरं घर झालं होतं... माझ्या वाढदिवसाला तू दिलेला महागडा ड्रेस अर्थात तुझी सगळी गिफ्ट्स भारी आणि अनमोल असतातच त्यात काही वादच नाही... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझी आई इथे नव्हती पण तुझ्या आईने पहिल्यांदा फोनवरुन मला दिलेल्या शुभेच्छा आजही लक्षात आहेत... एकंदर ४ नोव्हेंबरपासून २४ डिसेंबरपर्यंत आपल्या रिलेशनमध्ये कोणत्याच प्रकारचा तणाव नव्हता... ४४ दिवसांचा सुखद प्रेमप्रवास अविरतपणे चालू होता...

तुझ्याविना....

माझ्या आयुष्यातल्या पहिल्याच लव्ह स्पॉटवर माझी ताटतूट होईल असं कधीच वाटलं नव्हतं... त्या दिवसापासून पुन्हा कधी त्या ठिकाणी जावसंच वाटलं नाही त्यामागचं कारण हेच... आपलं प्रेम आपल्याला कसं परकं करु शकतो याचं जिवंत उदाहरण आपणंच होतो... माझ्यासाठी अनेक गोष्टी तुला सहन कराव्या लागल्या... तू ज्या पद्धतीने आपलं प्रकरण हँडल करतोयस ते खरंच वाखणण्याजोगं आहे... काही वर्षभरामध्ये आपली झालेली ताटातूट... घरातल्यांनी दिलेल्या शपथा आणि बरचं काही... पण तरी आपल्या प्रेमाने अनेकदा आपल्याला जवळ आणलं... सर्वेश आणि जागृतीचं प्रेम कायम राहिलं... पण किती दिवस असेच काढणार असे अनेक सवाल माझ्या मनात निर्माण झाले... त्यामुळे बऱ्याचदां फार तुझ्याशी कठोरही वागले... बऱ्याचदा लांब राहण्याचा प्रयत्नही केला... या आयुष्यात तर तुला विसरु शकणार नव्हते... तसा प्रयत्न करुनही काही फायदा नव्हता... पण दुसरा पर्यायही नव्हता... तुझ्याविना माझ्या आयुष्याला काहीच अर्थ राहिला नव्हता... आशा सोडली होती... आपलं दु:ख मनात ठेवून आनंदी कसं राहायचं आणि त्रास होऊ नये म्हणून एक वाईट स्वप्न होतं अशी समजूत काढायची आणि रात्री रडत झोपायचं... या पलीकडे काहीच जगण्याला अर्थ नव्हता... बिझी राहून आठवणी पुसता येत नव्हत्या... तुझी अवस्था काही वेगळी नसणार तू माझ्यासारखं बोलला नाहीस तरी तुझं माझ्यावर असणारं प्रेम मला नेहमी जाणवत होतं पण नुसतं प्रेम करुन फायदा नव्हता... (आता फायद्यासाठी प्रेम करतात हा शहाणपणा मनात आणू नकोस....) वाढदिवसाच्या निमित्ताने परत एकत्र येऊ असं वाटत होतं पण विश्वास नव्हता... आशा सोडली होती... स्वत:चा राग शांत करण्यासाठी आणि विसरण्यासाठी तुझा राग करायला लागले होते... व्हॉट्स अॅपवर मेसेज करताना नेहमीच मनातली चीड बाहेर काढली... आठवणी मिटवण्याचा प्रयत्न केला पण ते कधीच शक्य होणार नाही हे माहित होतं... पण तरीही ...

मुस्कुराने की वजह तुम हो.... 

तू माझ्या आयुष्यात असणं म्हणजे दुसरं कोणतंच सुख नाही... हे तुला सुद्धा माहित आहे... आज जे काही मी हसून खेळून राहतेय त्याच कारण म्हणजे तुझी मला असणारी साथ... तुझ्यासारखा मुलगा मला भेटूच शकत नाही आणि भेटला तरी मला तो नकोय... मला माझाचं सर्वेश हवाय... आजही तुझ्यासाठी काही करायला तयार आहे... तीन वर्षभरात देवासमोर उभं राहिल्यानंतर आजही आपल्य़ा रिलेशनसाठी केलेली प्रार्थना कायमची अंगवळणी पडलीये... देवावर असणारी श्रद्धा म्हणून काही मागायचं झालं तर तुझी मागणी पहिल्या क्रमांकावर नेहमीच असते... पण देवावर श्रद्धा ठेवणारे आणि त्याच्यावर प्रेम करणारे त्याच्यासमोर असतात असं म्हणतात... तू माझा देव आहेस सर्वेश.... कधी माझा गुरू तर कधी माझा हक्काचा माणूस... माझ्या आयुष्यात तुझं स्थान खरंच मोलाचं आहे... प्रॉमिस डे च्या दिवशी तुला दिलेलं वचन मी मोडणार नाही याची संपूर्ण जबाबदारी माझी... तुझ्या सुखासाठी काही करेन असं म्हणायला सोपं आहे पण करणं कठीण जरी असलं तरी माझा त्यासाठी कायम प्रयत्न असेल.... तुला पश्चाताप होईल असं माझं कोणतंच वागणं नसेल... तुला आणि तुझ्या कुटूंबाला खुश ठेवणं यातंच मी माझं सुख मानेन.... मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे वाक्य बोलून जरी गुळगुळीत झालं असलं तरी आजही वास्तव परिस्थिती तीच आहे...

एकमेकांविषयी फार काही वाटत असतं पण ते बोलायचं राहून जातं आणि म्हणूनचं आज मला तुझ्याविषयी वाटणाऱ्या भावना माझ्या शब्दांतून व्यक्त केल्या... समजू शकते एवढं वाचणं म्हणजे तुझ्यासाठी संयमाचा उद्रेक असेल...

(अपेक्षा करते की तू वाचताना काही गाळलं नसशील....)

I LOVE YOU SARVESH
फक्त आणि फक्त
तुझी जागृती

No comments:

Post a Comment