Monday, 16 February 2015

मैत्री एक आठवण... 
कुणीतरी आपलं असल्याची जाणीव...

(काही आठवणी सांगण्यापेक्षा लिखित स्वरुपाच्या असल्या की मनात कायमचं स्थान करुन राहतात आणि म्हणूनच तुझ्याविषयी वाटणारी आपुलकी, काही आठवणी खास तुझ्या वाढदिवसासाठी राखून ठेवल्या... कदाचित तुझ्यासाठी हे कधीही न विसरणारं गिफ्ट असू शकतं.)

आयुष्यात अनेक जण काही ना काहीतरी देऊन जातात... माझ्या आयुष्यात तसं पाहायला गेलं तर मित्र-मैत्रणींची कमतरता नाही पण या सर्व मित्र-मैत्रिणींच्या यादीमध्ये सगळ्यात टॉपला कुणाचं नाव येत असेल तर ते तुझं... (स्वप्ना लांडगे) आयुष्यात सगळेच जण मैत्री करतात, पण मैत्रीचं हे नातं टिकवायचं कसं याचं गणित तुला जास्त चांगलं जमतं. स्वभावाने जरा चिडकी असल्यामुळे सगळेच जण मुद्दाम माझी मस्करी करतात. मग ते शाळेतले Friends असो कॉलेजमधले किंवा आता ऑफिसमधले... मलाही तुमची मस्करी आपुलकीची वाटते. या सगळ्या गोष्टी मैत्रीमध्येच अनुभवयाला मिळतात. आपल्या वाईट प्रसंगी जे आपल्यासोबत असतात तेच आपले मित्र असतात याचं उदाहरण तूच आहेस. प्रेमापेक्षा मैत्रीचचं नातं अधिक घट्ट असतं याची जाणीव मला पदोपदी झाली. 

आयुष्यात अनेकजण येतात आणि जातात पण मैत्री आपली साथ कधीच सोडत नाही याचं जिवंत उदाहरण म्हणजे स्वप्ना लांडगे. माझ्या आयुष्यात अनेक वादळं आली ते पेलण्याचं सामर्थ्य माझ्यात नव्हतं परंतु Positive विचार करण्याची शक्ती तूच मला दिलीस. माझ्या सुख-दु:खात तू माझी साथ कधीच सोडली नाहीस. फक्त गेल्या वर्षी तू माझ्या वाढदिवसाला नव्हतीस याचं मला वाईट वाटलं पण माझ्या दु:खात तूच माझ्या पाठीशी होतीस ही आठवण मी कधीच विसरणार नाही.

तशी तुझी माझी  मैत्री अकरावी –बारावीपासूनची... एकत्र कॉलेजला जाणं, एकत्र येणं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पक्कया मैत्रिणी कधी झालो काही कळलचं नाही. त्या दिवसानंतर आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी आपण एकेकांशी शेअर केल्या. महत्त्वाचे निर्णय घेतानाही आपण एकमेकांना विचारायचो. कधी तुला यायला उशीर झाला की तुला ओरडायचे, वैतागायचे पण त्यामध्येही आपुलकीची भावना होती. तुझ्या वस्तू सांभाळताना स्पेशली जेव्हा तुझी आई मला कॉल करुन एखादी जबाबदारी द्यायच्या तेव्हा एकमेकांवरचा हक्क अधिक जाणवायचा. तेव्हापासूनच आपल्या मैत्रीच्या नात्यात आपलेपणा आणि हक्क या दोन्ही गोष्टी मनात घर करुन राहिल्या. माझ्या सुखासाठी तू फार काही केलंस, पण माझं सुख हे क्षणभंगुर होतं त्याला तू तरी काय करणार? प्रेम करणारे साथ सोडून गेले पण तू आजही तिथेच आहेस. माझ्या वाईट प्रसंगी तू मला धीर दिलास. खऱ्या अर्थानं माझं सांत्वन केलंस, ही गोष्ट आयुष्यात मी कधीच विसरणार नाही. आज मी जिवंत दिसतेय ती फक्त तुझ्यामुळे. जेव्हा जेव्हा माझ्या मनात वाईट विचार यायचा, माहित नाही पटकन तुझी आठवण यायची आणि रडत रडत माझं दु:ख तुला सांगून मोकळे व्हायचे. घरातल्यांनी मला खूप सावरलं, पण एक मैत्रिण म्हणून तू माझी साथ शेवटपर्यंत सोडली नाहीस. आजच्या या स्वार्थी युगात मोजकेच असे Friend आयुष्यात भेटतात आणि आयुष्यभर साथ देतात त्यापैकी तू एक....

बऱ्याचशा गोष्टी आपण एकमेकांशी बोललो पण आपली एकही गोष्ट बाहेर कुठे लिक झाली नाही याचा मला अभिमान वाटतो. आजकाल मी कशी वागते माझं मलाच माहित नाही. तू काही गोष्टी समजावून थकलीस, पण मी माझी तत्वं कशी काय विसरू शकते हेच मला कळत नाही.... तूला कितीही समजावण्याचा कंटाळा आला असला तरी एक-दोनदा समजावण्याचा प्रयत्न तू नक्की करतेस. ऐकली तर ऐकली.... असा तुझा समज असतो. सगळ्यात आवडलेलं तुझं मत म्हणजे जागृती तू सुखी राहणार असशील, तर मला हे नातं मंजूर आहे. तुझ्याशी ती गोष्ट शेअर केली आणि तुझा रिप्लाय ऐकल्यावर दोन सेकंद माझं मलाच कळलं नाही. कदाचित मी सहन केलेला त्रास तू जवळून पाहिलास, तुला माझी काळजी वाटत होती आणि तुझ्यासाठी मी महत्त्वाचे होते याची जाणीव तुझ्या रिप्लायमधून पुन्हा एकदा तू करून दिलीस. एकदा नको जाऊ असं बजावलं होतंस त्यावेळी एका बाजूला खूप छान वाटलं कारण हक्काने तू मला ते बजावत होतीस पण एका बाजूला माझं मन त्या ठिकाणी खेचून नेत होतं. मनाची द्विधा अवस्था झाली होती शेवटी तूच येऊन मला समजवलंस आणि परमिशनही दिलीस. माझं भलं व्हावं यासाठी माझी आई, दादा झटत असतात पण त्यांच्या यादीत तुझंही नाव तितक्याच हक्कानं पुढं येतं. 

आज जे काही जीवन जगतेय त्यात तुझं प्रेम, आपुलकी याचा मोलाचा वाटा आहे. खूप काही चांगल्या गोष्टी आपण एकमेकांना सांगू शकत नाही. आभार मानायचे राहून जातात पण मैत्रीत कसले आभार मानायचे... पण काही गोष्टी लिहायला लागलो की अचानक सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि डोळे पाण्याने भरुन येतात.

माझ्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी खास वेळ काढावासा वाटला. खरंतर कधीपासून तुझ्याबद्दल माझ्या मनात असलेली आपुलकी सांगावीशी वाटत होती, पण त्याचा शुभारंभ आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी झाला. याचा जास्त आनंद मला होतोय. माझ्या भावना माझ्या शब्दांमार्फत तुझ्यापर्यंत पोहचतील अशी आशा बाळगते.

.... आणि हो असं कुणीतरी आपल्या वाढदिवशी आपलं कौतुक करणारं पत्र लिहावं हे फार दुर्मिळच असेल. कदाचित तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यातलं अनोखं गिफ्टही असेल असं मला वाटतं. बोलण्यातून कधी कधी प्रेम व्यक्तचं करता येत नाही आणि तसं शक्य झालं तर मी बोलण्यापेक्षा जास्त रडत बसेन आणि मला हसवण्यासाठी तू एखादा जोक क्रॅक करशील म्हणून आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझ्या आयुष्यात कायम लक्षात राहील असं अनोखं गिफ्ट.

''मैत्री माझी पुसू नकोस आणि मला कधी विसरू नकोस...
माझ्या मैत्रीची जागा कुणाला देऊ नकोस...

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....

माझ्या मैत्रिणीला उज्जवल आयुष्य दे ...  हीच देवाचरणी प्रार्थना...



No comments:

Post a Comment