Thursday, 9 April 2015


चाळ नावाची वाचाळ वस्ती ....


सुखातला आनंद द्विगुणित करण्यासाठी, तर दु:खाचा भार मिळून वाटून घेण्यासाठीच असतो, हेच जणू चाळीत राहणाऱ्या लोकांचं समीकरण असतं.

काही जुजबी, अपरिचित कुटुंबाचा भार उचलणारी वस्ती म्हणजे चाळ. चाळ म्हणजे एक वेगळीच दुनिया ..... मुक्तपणे जीवनाचा आनंद कुठे लुटता येत असेल तर तो चाळीमध्येच. मनानं श्रीमंत असलेली माणसं जगाच्य़ा कानाकोपऱ्यात कुठे पाहायला मिळत असतील तर ती चाळीत.... चाळीविषयी अनेक गप्पा आपल्या आजूबाजूला ऐकायला मिळतात परंतु नेमकं चाळीमध्ये एवढं असतं तरी काय ? हे चाळीत राहिल्याशिवाय अनुभवताच येणार नाही. गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला चाळीविषयी वाटणारं आकर्षण चाळ सोडून गेल्यावर प्रकर्षानं जाणवतं. अशाच काही आठवणी माझ्या चाळीविषयी.... 


जोगेश्वरीमध्ये प्रसिद्ध असणारी आमची 'बांद्रेकरवाडी' आणि याच बांद्रेकरवाडीच्या कुशीत कित्येक वर्षापासून अस्तित्वात असलेली राव चाळ. एकमेकांच्या कुटूंबाविषयी जाणून घेतल्याशिवाय दिवसाची सुरूवात होत नाही. लवकर उठ रे.... वाजले किती हा सूर सगळ्यांच्याच घरी कमी जास्त स्वरात ऐकायला मिळतो. स्वच्छतेला सर्वाधिक महत्व देणाऱ्या आमच्या चाळीतल्या बायका काही औरच... सकाळी १० वाजेपर्यंत सगळ्यांचेच दरवाजे चकाचक धुतलेले. पूर्वी पाण्यासाठी आमच्या इथे सार्वजनिक नळ होताआता मात्र सगळ्यांच्या घरी एक स्वतंत्र नळ आहे. पाण्याचा फोर्स कमी झाला की लगेच नळ बंद करा ..... किती पाणी वापरणार? यावर आजूबाजूला अनेक खटके उडतात आणि यामध्ये मराठी आणि हिंदी भाषेत शाब्दिक वाद झाले तर त्या भांडणाला एक वेगळीच मज्जा येते. फेरीवाले कुणी आले की त्यांच्यांशी हिंदीत बोलताना आणि विशेषत: बार्गेनिंग करताना सुरू असणारी चढाओढ पाहताना वेगळीच मज्जा येते. उदाहरण द्यायचं झालं तर "क्या भैया इतनासा दिया, मेरे आदमी को पता चलेगा तो मुझे बोंब मारेगा"..... आणि बरंच काही....



फळवाले, भाजीवाले, रद्दीवाले, डबा-बादलीला बूड, पिपाला नळ बसवणारे, चाकू-सुरी-विळीला धार करणारे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रेत्यांची रेलचेल आमच्या चाळीत ठरलेली. त्यामध्ये काही भिकारी आलेच तर त्यांना पैसे देऊन "कितनी बार आते हो"  असा टोला पण आम्ही लगावतो.... स्वयंपाक झाल्यावर तुम्ही काय केलं? आपल्या घरातली भाजी आवडत नसेल तर तेवढ्याच आपुलकीने बाजुच्या काकूंकडे हक्कानं जायचं आणि त्यांना विचारायचं आणि ते हक्काचं घर म्हणजे आमच्या शेजारच्या 'यादव काकी'.  त्यांचा स्वयंपाक कोल्हापूरी पद्धतीचा असल्यामुळे त्याचं जेवण मला फार आवडतं. मग कधी आमच्या घरी आवडता पदार्थ नसेल तर त्यांच्याकडे असणारी भाजी हक्कानं मागायची आणि त्यांच्या जेवणाचं कौतुक करायचं. ही आपुलकी कदाचित गगनचुंबी इमारतीत मिळणं अशक्यच. 



आमच्या चाळीतली घरं समोरासमोर असल्यामुळे एकमेकांच्या घरांवर लक्ष असायचं. त्यामुळे कुठे बाहेर जायचं असेल तर तेवढ्याचं हक्कानं आणि विश्वासाने समोरच्या काकूंना सांगायचं जरा बाहेर जाऊन येतो, घराकडे लक्ष असू दे. या साऱ्या गोष्टीमुळे आमच्या चाळीतली माणसं अधिक कुटूंबासारखी वाटतात. जगण्याची शैली, वागण्याची तऱ्हा आणि प्रत्येकाचा स्वभाव यामुळे आमच्या चाळीला एक वेगळाच हुरूप आला. एकमेकांकडे ऊठबस रात्री बारा वाजेपर्यंत सरायची नाही. 



आमचा जन्म, बालपण, कर्तबगारी कौतुकाने पाहणाऱ्या या चाळीने इथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या स्वभावात स्वत:चं बीज पेरलयं. ज्या चाळीत आम्ही वर्षानुवर्षें राहिलो, बागडलो, वाढलो ती चाळ, चाळीतल्या प्रत्येक माणसाने आपापल्या स्वभावाने सजीव केली. साधारणत: तीस घरांच्या कुटूंबाची आमची चाळ. नाना जातीची बिऱ्हाडं या चाळीत सुखानं नांदतायतं. प्रत्येकाच्या नावात, गावात, जातीत फरक असला तरी आपलेपणाची भावना सगळ्यांमध्ये समान आहे.  आमची चाळ आणि आम्ही अगदी सामान्य. मिळूनमिसळून जगताना माणूस म्हणून, शेजारी म्हणून जगण्याचे धडे मात्र प्रत्येकाने इथेच गिरवले. 



जानेवारी महिन्यामध्ये चाळीमधली बच्चे कंपनी कोणत्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतील तर ती आमच्या चाळीतल्या 'सत्यनारायण पूजेची'. रात्रभर बाहेर मज्जा करायची,  एकमेकांची नक्कल करणं हे तर आमच्या रक्तातच भिनलेलं असायचं.  चाळीतल्या बायका एकत्र येऊन लहान मुलांच्या आनंदात सामील होतात.  गप्पा, मज्जा मस्करी यामध्ये  पहाट कधी व्हायची हे आम्हांला समजतंच नाही. अशा अनेक गंमतीदार आठवणींनी आमच्या मनात एक वेगळं घर करुन ठेवलंय...



कालौघात प्रत्येक जण कामानिमित्त, गरजेनिमित्त चाळीबाहेर पडले... आपलं बिऱ्हाडं गुंडाळताना प्रत्येकानं चाळीतल्या आठवणींची शिदोरी सोबत नेलीच होती. काळानुसार आमच्या चाळीसुद्धा आजकाल बदलू लागल्या आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली इथं बिल्डिंग उभ्या राहणार आहेत. त्याकरता बिल्डरांकडून खेळल्या जाणाऱ्या राजकारणामुळे इथलं वातावरण ढवळून निघतयं. सारी काही समीकरणं बदलत आहेत. पैशांच्या लोभापायी माणसं दुरावली जात आहेत. उद्या भविष्यात अशा हजारो चाळी पुर्नविकासाच्या नावाखाली पडून त्या जागी टॉवर दिसतील पण "चाळ नावाची वाचाळ संस्कृती" प्रत्येकाच्या मनात घर करून राहू दे असंच नेहमी मला वाटत असतं.



चाळीतल्या त्या एका खोलीत मिळणारा आनंद अवर्णनीय आहे.
एकत्र आणि विभक्त कुटुंब पद्धतीतल्या फरकासारखंच आहे !

No comments:

Post a Comment