आज जगभरात
स्त्री स्वतंत्र्याबद्दल कंठशोष केला जात आहे. मात्र स्त्रियांवरील अन्यायाचं
प्रमाण अजूनही कमी होण्याचं नाव घेत नाही. भारतातील वाढते बलात्कार हा चिंतेचा
विषय आहेच. पण त्यावर आता महिलांच्या स्वातंत्र्याला आवर घाला असा आवाज जितका आहे,
त्याहून जास्त पुरूषांच्याच विचारसरणीला योग्य दिशा देण्यासंदर्भात आवाज उठवला जात
आहे. स्त्रियांवर निर्बंध घालणाऱ्या तालिबानी मनोवृत्तीला आव्हान देण्याचं
सामर्थ्य आपल्या स्त्रियांमध्ये निर्माण होत असताना प्रत्यक्ष तालिबानचं एकेकाळी
वर्चस्व असणाऱ्या अफगाणिस्तानातील स्त्रियांची परिस्थिती किती बदलली आहे?
स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा आजही धोक्यात आहे. स्त्री उपभोग्य
ठरू नये, यासाठी तिच्यावर लादलेल्या मर्यादा या स्त्रियांना गुदमरायला लावत आहेत. समाजातल्या
काही स्त्रियांना शिक्षण, सत्ता, संपत्ती या अधिकारापासून वंचित राहावं लागतंय. मुस्लिम
स्त्रियांचे प्रश्न आणि धर्म समाजव्यवस्थेच्या चौकटीत त्यांची होणारी घुसमट, धार्मिक
कायद्यांचा आधार घेऊन स्त्रियांवर लादली जाणारी बंधनं, जीवाचा कोंडमारा सहन करत आयुष्य़
जगणाऱ्या अफगाणिस्तानातल्या स्त्रिया या पुरूषसत्ताक धर्मांधतेच्या बळींचं
एक प्रतिक...
सतत पाचवीला
पूजलेलं युद्ध आणि कडव्या धर्मांधांच्या हाती असलेली समाजाची सूत्रं यांच्या
कचाट्यात गेली तीन दशकं अफगाणिस्तानातला समाज पूर्णपणे होरपळतोय. जगण्याची
केविलवाणी धडपड, अस्तित्वात असलेल्या पिढीला कट्टरवाद्यांपासून वाचवणं आणि नवा देश
घडवण्याची उमेद अशा तिन्ही पातळ्यांवर सामान्य अफगाण स्त्री जीवाची बाजी लावून
लढतेय. या लढाईत तिच्या बाजूने ना समाज आहे, ना सरकार, ना आपण.
जेव्हा
समाजावर मूलतत्ववाद्यांचं वर्चस्व असेल तर त्याची सर्वाधिक झळ बसते ती सामान्य
स्त्रियांना. या महिलांकडून त्यांचे जगण्याचे मूलभूत हक्कच हिरावून घेतले जातात.
इथल्या स्त्रियांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, संचारस्वातंत्र्य या हक्कांपासून
वंचित ठेवलं जातं. तालिबानी प्रवृत्तीने खैबर खिंड ओलांडत पाकिस्तानातील स्वात
खोऱ्यातील तब्बल २०० शाळा भस्मसात केल्या. यामध्ये मुलींच्या शाळांची संख्या अधिक
होती. इस्लामी कायद्यांचं उल्लघंन करणाऱ्यांना सार्वजनिकरित्या फाशीची शिक्षा
देणे, प्रसंगी त्यांना गोळ्या घालून ठार करणे असे प्रकार स्वात खोऱ्यात नेहमीचेच
झाले आहेत. या अफगाणिस्तानात नुकताच एक कायदा संमत झाला असून या कायद्यान्वये लग्न
झालेल्या महिलेवर तिच्या पतीनेच बलात्कार केला तर तिला त्यासाठी दाद मागता येणार
नाही. या कायद्यानुसार महिला तिच्या पतीची लैंगिक सुखाची अपेक्षा डावलू शकणार नाही
अशा कठोर कायद्यांशी अफगाण स्त्रियांना नेहमीच सामना करावा लागतोय.
अफगाणिस्तानातील महिलांची दुरवस्था
अंगावर काटा आणणारी आहे. त्यांच्या आरोग्याची अवस्था अत्यंत बिकट असून तालिबानात
दर अर्ध्या तासाला एक महिला प्रसूतीदरम्यान मृत्यूला सामोरी जातेय. या मृत्यूदरामध्ये
अफगाणिस्तानचा दुसरा क्रमांक आहे. आरोग्यासंबंधीच्या एकूणच उदासीनतेमुळे या
महिलांचं सरासरी आर्युमान ४४ वर्षांपर्यंतच आलंय. त्याचबरोबर सततचा दुष्काळ आणि
लढाया यामुळेही महिला, विशेषत : गर्भवती महिलांमध्ये
कुपोषणाचं प्रमाण वाढतय. अफगाणिस्तानातील स्तनपान देणाऱ्या एक तृतियांश माता
कुपोषित असल्याचं एका पाहणीत दिसून आलं.
तालिबानींच्या
अशा अमलामुळे येथील महिलांना उपचारासाठी महिला डॉक्टरांचीच मदत घेणं बंधनकारक असतं.
पण महिलांच्या शिक्षणावरच बंदी असल्याने पुरुष डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यायचे नसतील,
तर शेवटचा श्वास घेण्यापलीकडे त्याच्याकडे कोणताच पर्याय नसतो. त्यामुळे तालिबानची
जन्मभूमी असलेल्या अफगाणिस्तानात महिलांची स्थिती अत्यंत बिकट आहे. तसंच तालिबानी
कायद्यानुसार आठ वर्षावरील मुलींना शिक्षण घेण्यास देखील बंदी असल्यामुळे तेथील
तब्बल ७८ टक्के महिला शिक्षणापासून वंचित आहेत. आतापर्यंत अफगाणिस्तानच्या शहरी
भागातील अवघ्या ३० टक्के मुलींची शिक्षणाशी तोंडओळख झाली असून ग्रामीण भागामध्ये तर
हे प्रमाण अवघा एक टक्का आहे. त्यामुळे युनिसेफच्या आकडेवारीनुसार, तेथील ७४८
शाळांपैकी निम्म्या शाळांना टाळं लावावं लागलं.
या
महिलांची अवस्था केवळ घराबाहेर बिकट आहे, असं नाही तर त्यांच्या आयुष्याची परवड
अगदी घरापासूनच सुरू होते. अफगाणिस्तानातील तब्बल ९५ टक्के स्त्रियांना कौटुंबिक
हिंसाचाराला सामोर जावं लागतंय आणि येथील कायदेही महिलांच्या बाजूने नसल्यामुळे
महिलांची प्रचंड घुसमट होते. या स्त्रियांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरत नाही
त्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांच्या आत्महत्येचं प्रमाण अधिक असलेला अफगाणिस्तान हा
एकमेव देश आहे.
याशिवाय
या प्रांतातील बालविवाहाची प्रथाही मुलींची अवस्था दयनीय करुन टाकणारी आहे. त्याला
कारणीभूत आहे, ती या भागातील गरिबी. मुलांचं लवकरात लवकर लग्न करुन टाकलं, तर
किमान पैशांची तरी सोय होईल, या लालसेने पालक लहान वयातच त्यांचा निकाह लावून
टाकतात. त्यामुळे ७० ते ८० टक्के मुलींना लग्नाचं वय गाठण्याच्या आतच विवाहबंधनात
गुंतवलं जातं. य़ामध्ये ५० टक्के मुलींचं वय १६ पेक्षाही कमी आहे.
तालिबानची
राजवट अफगाणिस्तानातून उलथून टाकण्यात आली असली तरी त्यांनी निर्माण केलेली दहशत
आजही इथे राहणऱ्या महिलांच्या मनात आहे. या असहाय्य परिस्थितीही केवळ कुटुंबाला
जगवण्यासाठी आणि जगण्य़ासाठी सामान्य अफगाण स्त्रीला पदोपदी संघर्ष करावा लागतोय.
शिक्षणाचा
अभाव, पाश्चात्य संस्कृतीबद्दलची घृणा आणि मूठभर मौलवींच्या हाती असलेली
शरियाप्रणित हुकूमत... या सर्वांची उपज स्त्रियांवरील बंधनांमध्ये प्रतिबिंबित होत
आहे. धर्माचीच शिकवण असल्यामुळे त्याविरोधात ब्र काढण्याची हिंमत स्वतः
स्त्रियांमध्येही नाही. मात्र '' या स्त्रियांमध्ये
स्वत्वाची जाणीव निर्माण करणं ही माणुसकीच्या नात्याने आपलीही जबाबदारी आहे.''
No comments:
Post a Comment