श्रध्दा 'अंधश्रध्दा ' बनते तेव्हा .......
आपल्या आजूबाजूला अंगाला पिवळा रंग
लावलेले, हातात आसूड घेऊन जमिनीवर मारत सगळ्यांना घाबरवत पळवणारे, रस्त्यावर
धुडगूस घालणारे पोतराज, तसेच अंगात आलेल्या बायका, माना फिरवून अंगावर लिबांच्या
फाट्याने स्वत: ला मारुन घेताना दिसतात. केस मोकळे, कपाळभर कुंकू मध्येच
कुणी बायका येऊन अंगात आलेल्या बाईच्या पायावर डोकं ठेवून किंवा मुलाला पायावर ठेवून
जाताना दिसतात. नारळ फुलं, उदबत्या, देवीपुढे साड्यांचा ढीग असे निरनिराळे प्रकार
पाहायला मिळतात.
पूर्वी देवळात फक्त समई आणि बाहेर एक विजेचा
दिवा असायचा. आता देऊळच नव्हे तर आसपासचा संपूर्ण परिसर दिव्याच्या रोषणाईने झगमगताना
दिसतो. आजकाल नवसाचे नारळ आणि पाळणे लावायला देखील देऊळं पुरत नाही.
गणपती उत्सव असो, देवीच्या नवरात्रीचा उत्सव
असो, एखादे तीर्थक्षेत्र असो, कुठ्ल्याही साईबाबांचे, देवीचे, मारुतीचे देऊळ असो किंवा चर्च, मशीद असो तिथे भाविक असंख्य संख्येने उपस्थित
असल्य़ाचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. हे सगळं बघितल्यानंतर असा प्रश्न पडतो की ही
भक्ती, श्रद्धा की इरिशिरी ? या सगळ्याच धर्मामध्ये देवाचे प्रस्थ वाढलेलं दिसत आहे.
असं म्हटलं जातं की माणूस जेव्हा अध्यात्माकडे वळतो तेव्हा
तो उत्क्रांतीकडे जात असतो, अंताकडे जात असतो जिथे परमेश्वर असतो, जिथे त्याचा
शेवट असतो. पण ख-या अर्थाने अध्यात्माकडे वळलेला माणूस विरक्तीकडे वळलेला असतो.
त्याचा संसारातला रस हळूहळू कमी होत जातो. परमेश्वराच्या चिंतनात त्याचा वेळ जास्त
जातो. इथे श्रद्धा दिसते भक्ती दिसते पण काही तरी मागण्यापुरती. इथे आलेला
प्रत्येक माणूस काहीतरी मागण्यासाठी आलेला दिसतो. कोणाला मूल पाहिजे, कोणाला
नोकरी, कोणाला व्यवसायात यश तर कोणाला सत्ता अशा एक ना अनेक मागण्या घेऊन लोक तिथे
येतात.
देवावर श्रद्धा असणे वाईट नाही.
श्रद्धेमुळे आत्मिक बळ मिळतं असं म्हटलं जातं. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात
प्रत्येक मनुष्य मनाला शांती मिळण्यासाठी जागा शोधत असतो आणि जास्तीतजास्त लोक त्यासाठी
देवळात जाण्याचा मार्ग अवलंबतात. कही लोकांच्या मते देव ही एक संकल्पना आहे. एखाद्या
शक्तीला परमेश्वर मानून त्याच्यावर श्रद्धा ठेवून कुणाचं भलं होणार असेल तर होऊ
दे. सगळे प्रयत्न करुन परमेश्वर मला नक्की यश देईल अशी श्रद्धा ठेवणं वेगळं, पण
काहीच न करता परमेश्वर करेलच अशी अंधश्रद्धा ठेवल्यावर जर आपले काम नाही झालं तर
मात्र श्रद्धाळूंचा देवावरचा विश्वास तर उडतोच पण प्रत्येक गोष्टींवर असणारा त्याचा
विश्वास डगमगायला लागतो, तो निराश होतो आणि सगळं जीवनच विस्कळीत होऊन जातं.
देव आहेच आणि तो काम करणारच असे समजून
देवाला प्रत्येक गोष्टीसाठी नवस करणं, काहीच न करता देवावर नुसती श्रद्धा ठेऊन
बसून राहणं हा अतिरेक झाला. लहान मुल आई घरात दिसली नाही की घाबरतं, पण आई दिसली
की आई आपल्या पाठीशी आहे म्हणून ते बिनधास्त खेळत त्यातून सगळं शिकतं राहतं. आपली
श्रद्धा तशीच असली पाहिजे. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे म्हणून सगळी कर्तव्ये
धैर्याने पार पाडली तर ती श्रद्धा कामाला येते.
पण माणूस फक्त देवावरच श्रद्धा ठेवतो
असं नाही तर त्याच्या अनेकांवर श्रद्धा असतात. नेहमी पाहण्यात येणा-या लोकांपैकी
काही आई वडीलांवर श्रद्धा ठेवणारे, साधूवर श्रद्धा ठेवणारे, वास्तूशास्त्रावर
श्रद्धा ठेवणारे, मांत्रिकावर श्रद्धा ठेवणारे, अंगात देव-देवी येते त्यांच्यावर
श्रद्धा ठेवणारे, भविष्यावर श्रद्धा ठेवणारे असतात. काही जण सतत घर बदलणं, विकणं,
किंवा घरात सतत भिंती पाडणं, वस्तूंची हलवाहलव करणं यातच गुंतलेले असतात. पैशाचा
आणि वेळेचा किती व्यय होतो याकडे त्याचं लक्षच नसतं. मग पैसै कमी पडला की घर चांगलं नाही, मग ज्योतिषाकडे जाऊन ज्योतिषी
सांगेल तसं करणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आसतात. हे चक्र अव्याहत चालू असतं. ज्योतिष
शास्त्रावर नितांत श्रद्धा असणारे लोक देखील आहेत. जे सतत कुठल्या ना कुठल्या
ग्रहाला शांत करण्यात मग्न असतात.
लोक गुरुमंत्र घेतात. गुरुवर
श्रद्धा ठेवायलाच पाहिजे. ते जो मार्ग दाखवतात त्या मार्गाने जायचे सोडून त्यांची
सेवा करण्यातच काही लोक मग्न असतात. सतत त्यांच्या अवतीभोवती असणं. घरात म्हातारे
आईवडील असतील तर, त्यांना औषधपाणी करणार नाहीत, पण गुरुंना वस्त्र दान देणं, चांदी-सोन्याच्या
वस्तु देणं. अशा लोकांचे परमेश्वर चिंतन कमी असते. मग मांत्रिक तांत्रिक गाठायचे,
कुठून तरी ताविज आणायचे, नारळ घरात आणून बांधायचे असेच प्रकार हास्यास्पद प्रकार
पाहयला मिळतात.
या सगळ्यात चांगले शिकलेले,
सुशिक्षित, मोठ्या पदावर असलेल्या लोकांचाही समावेश असलेला दिसून येतो. हे असं
वागताना किंवा त्यांचा या गोष्टीत असलेला समावेश पाहून प्रश्न पडतो की शिक्षण
म्हणजे फक्त डिग्र्या का? ज्या शिक्षणातून खरे खोटे, चांगले वाईट काहीच समजत नाही
अशा शिक्षणाचा काय उपयोग ? समजून घेऊन श्रद्धा ठेवणे गैर नाही पण श्रद्धेची
अंधश्रद्धा होऊ नये ह्याची सुशिक्षित लोकांनी तरी काळजी घ्यायला पाहिजे. श्रद्धेची
अंधश्रद्धा होऊन विपरित काही घडू नये यासाठी आपण सतर्क राहायला पाहिजे.
सत्य नाकारते ती अंधश्रध्दा आणि सत्याला सामोरं जाण्याचं आत्मिक बळ देते ती श्रध्दा