.... त्या दिवशी आचारा गाव होतं निकामी
‘बा देवा
रामेश्वरा’.... तुझ्या हुकूमानुसार आज आचरा गाव आम्ही रिकामं
करतोय, सगळ्यांची रखवाली कर आणि वर्षानुवर्षे चालणारी ही प्रथा खरी करुन घे...
आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरात दर तीन वर्षांनी असंच गा-हाणं घातलं जातं आणि भक्तांचा
‘होय महाराजा’ चा स्वर घंटानादासह दणाणू
लागतो... गाऱ्हाण्यानंतर श्री रामेश्वर मंदिराची तिन्ही प्रवेशद्वारं बारा पाचाच्या
मानकऱ्यांच्या हातानं बंद केली जातात... नगारखान्यातील नगारा दणाणतो... आणि तीन
दिवसाच्या गावपळणीसाठी संपूर्ण आचरा गाव वेशीबाहेर जाण्यासाठी सज्ज होतो...
कोकणात सण-उत्सव आणि प्रथा-परंपरांना मोठं महत्त्व आहे. गैरवशाली
परंपरा लाभलेल्या मालवण तालुक्यातील आचरे या गावात शेकडो वर्षाची एक अनोखी प्रथा आजही जोपासली जातेय. दर तीन वर्षानंतर गावपणळणीची कुजबूज कोकणात होते. मार्गशीष
महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला रामेश्वराला कौल
लावला जातो. देवाचा कौल मिळाल्यानंतर गाव
पळणीची तारीख निश्चित होते आणि त्या दिवशी संपूर्ण गावातील समस्त शेतकरी,
दुकानदार, व्यावसायिक, मजूर बायका, मुले, गुरं-ढोरांसह गावाच्या वेशी बाहेर पडतात.
यावेळी शाळाही भरत नाही. शासकीय कार्यालयांमध्ये ग्रामस्थांचा लवलेशही नसतो.
गावपळणची प्रथा मालवण
तालुक्यातील वायगंणी, चिंदर, मुणगे या गावांमध्येही दिसून येते. आचऱ्यातील
पारवाडी, कारवणे, देऊळवाडी बाजारपेठ, त्रिंबक पिरावाडी, जामडूल नदी, गाऊळवाडी,
भंडारवाडा, हिर्लेवाडी-वायंगणी या गावातील वेशीबाहेर पडणारे काही ग्रामस्थ आपल्या
नातेवाईकांकडे वास्तव्य करतात तर काहीजण मालवण भगवंत गडाच्या रस्त्यालगत राहुट्या
थाटतात. तात्पुरत्या स्वरुपाच्या बांधलेल्या राहुट्या बघितल्यानंतर जणू काही वेगळं
गावंच थाटल्यासारखं वाटतं. नोकरी उद्योगाच्या निमित्तानं परगावी जाणारे किंवा
मुंबईला असणारी मंडळी तीन वर्षांनी येणाऱ्या या वेगळेपणाची जपणूक करण्यासाठी एकत्र
येतात.
शेकडो वर्षाची परंपरा ग्रामस्थ
मोठ्य़ा श्रद्धेनं जोपासत आहेत. तीन दिवस आणि तीन रात्री नंतर बारा पाचाचे मानकरी
गाव भरवतात आणि रामेश्वराला कौल लावतात त्या दिवशी कौल झालाच नाही तर एक दिवस वाढवला जातो त्यानंतर पुन्हा
चैथ्या दिवशी कौल दाखवला जातो रामेश्वरानं कौल दिला तर पुन्हा
तोफांचा आवाज दणाणतो आणि आचरेवासीय पुन्हा आपल्या गावी परतात.
शेकडो वर्षांपासून चालत आलेली
गावपळणीची प्रथा का आणि कशासाठी? याविषय़ी अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र ही गावपळण आपलं वेगळेपण दाखवते
हे मात्र निश्चित.