गेले ते दिवस
राहिल्या त्या फक्त आठवणी.......
शाळा...
आपली शाळा म्हण्यापेक्षा प्रत्येकाला माझी शाळा म्हण्यालाच फार आवडतं. आपुलकी, माया, प्रेम, शिस्त आणि ज्ञानाचा खजिना कुठे मिळत
असेल तर तो शाळेतच. माझ्या शाळेला मी कधीच विसरु शकत नाही. मुंग्या जशा वारुळातून
बाहेर पडतात तशाच या शाळेच्या आठवणी आहेत. शाळेची एक आठवण अनेक आठवणींना उजाळा देत असते. शिक्षकांनीही आमच्या मनावर अशाच काही आठवणी कोरुन ठेवल्या
आहेत. त्याच आठवणींची आज आठवण येतेय.
जोगेश्वरीच्या हायवेला
लागून असणारी अस्मिता माझी शाळा. सगळ्यांच्याच परिचयाची
आहे. शिशु वर्गापासून दहावीपर्यंतचं संपूर्ण शिक्षण या शाळेत घालवल्यामुळे
शाळेबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. शाळेतल्या मित्र-मंडळींची येणारी आठवण
सहाजिकच आहे पण या सोबतच आम्हांला आठवण येतेय ती आमच्या बाईंची.
पहिलीच्या वर्गातल्या मुंलांना
काय हवयं नकोय या गोष्टींकडे लक्ष देणाऱ्या, लहान मुलांची आवड-निवड ओळखण्यामध्ये प्राथमिकच्या शिक्षकांची मोठीच कसरत
असते. प्राथमिकला असताना पहिली ते चौथीपर्यंत आम्हांला एकच बाई शिकवायला होत्या.
त्याचं नाव सौ. गद्रे बाई. सगळया विषयांची ओळख करुन देणाऱ्या, इतर कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करणाऱ्या, सोप्या पद्धतीने गणिताची ओळख करुन देणाऱ्या आणि नावडत्या
विषयाची आवड निर्माण होईल असं भन्नाट काहीतरी सांगणाऱ्या आमच्या बाईंना आम्ही कधीच
विसरु शकत नाही. त्यांच्या पर्सनालिटीबद्दल, त्यांच्या साड्यांबद्दल आम्ही नेहमीच चर्चा करायचो. बाईंनी केसात गजरा माळला
असेल किंवा एकंदर बाईंनी काहीतरी वेगळं केलं असेल तर ते लगेचच आम्हांला समजायचं.
कारण आवडणाऱ्या व्यक्तीला आपण खालपासून वरपर्यंत न्याहळत असतो. तशाच आमच्या बाई
होत्या, सगळ्यांच्या आठवणींत राहतील अशा.
चौथीचं वर्ष कसं संपलं ते समजलच
नाही. निरोप समारंभ जवळ आला होता, प्राथमिकमधून
माध्यमिकमध्ये जाणार यासाठी निरोप समारंभ असतो याची कल्पना होती परंतु पुढच्या
पाचवीच्य़ा इयत्तेत बाई आपल्याला शिकवायला नसणार याची कल्पनाच नव्हती. अखेरीस निरोप
समारंभाचा दिवस उजाडला. वर्गात आम्ही मस्त अंताक्क्षरी खेळत होतो, विनोद सांगत होतो, एकमेकांची खिल्ली उडवत होतो एकंदर
खूप मजा करत होतो पण यावेळी बाई आमच्यात फार काही मिसळल्या नाही. बाईकडे
बघितल्यावर बाईंचे डोळे पाण्याने भरलेले होते, पण आम्हांला
काहीच उमगत नव्हतं. त्यादिवशी आम्ही जास्तच दंगा करत होतो तरी बाई आम्हांला
ओरडल्या नाही.
काही दिवसानंतर आम्हांला समजलं... त्यादिवशी बाई का शांत होत्या, बाई का रडत होत्या. यापुढे बाई आम्हांला शिकवायला नसणार आणि आम्ही बाईंना त्रास द्यायला नसणार याचं बाईंना वाईट वाटत होतं. बाई आम्हांला शिकवायला नसणार याची जाणीव पाचवीत झाली. मोठ्या वर्गात गेल्यानंतर बाईंची अधिकच उणीव जाणवायला लागली. रोज मधल्या सुट्टीत बाईंना भेटायला जायचो, बाईंशी गप्पा मारायचो आणि रोज आमचा अट्टहास असायचा ‘’ निदान एक विषय तरी शिकवायला या ना बाई.’’
“ बाईं तुम्ही आम्हांला
मारलंत तरी चालेल किंवा आम्ही बाई कधीच मस्ती करणार नाही, आम्ही मस्ती केली तर
तुम्ही परत आमच्या वर्गात शिकवायला येऊ नका ” इतपत आमची समजावणी चालली होती. पाचवीच्या वर्गात जाऊच नये असं वाटायचं.
मधल्या सुट्टीत परत बाईंना भेटायला जायचो तेव्हा बाईंना म्हणायचो ‘’ बाई निदान पी.टी चा विषय तरी तुम्ही शिकवा नाहीतर संगणक तरी शिकवायला या “ असा आमचा नेहमीचा अट्टहास असायचा. बाईंशी गप्पा मारताना मधली सुट्टी कधी
संपायची हेच समजायचं नाही. असे किती दिवस असतील बाईंशी बोलण्यासाठी आम्ही प्राथमिक
विभागात जाऊन गप्पा मारायचो आणि डब्बा खायचा विसरुनच जायचो. आमच्या बाईंशी गप्पा
मारण्यातच आमचं पोट भरुन जायचं. आमच्या आग्रहापायी आणि आमची समजूत काढताना बाईंनी
वास्तव स्थिती काय असते ते सांगितलं “ दर चार वर्षांनंतर आमच्या
हाताखालून अनेक विद्यार्थी माध्यमिकला जात असतात. तसे या वर्षी तुम्ही जात आहात, आम्हांलाही या गोष्टीचं
खूप वाईट वाटतं.” बाईंनाही रडायला आलं.
काही महिन्यानंतर आम्हांला समजायला लागलं आता बाई आपल्याला कधीच शिकवायला
नाही येणार. मग बाई कुठेही भेटल्या की आम्ही लगेच जाऊन त्यांच्या पाया पडायचो, त्यांची
विचारपूस करायचो त्याही आम्हांला अभ्यासाबद्दल विचारायच्या, आपूलकीने
चौकशी करायच्या, आमच्या पालकांबद्दल विचारायच्या कारण पालक
त्यांचे पाल्य आणि बाई असं वेगळं नातं निर्माण झालं होतं.
बाई आम्हांला आता
शिकवायला नसणार हे आम्ही समजू शकत होतो पण बाई आम्हांला कायमच्या सोडून जातील असं
कधीच वाटलं नव्हतं. आमच्या बाईंना घशाचा कॅन्सर झाला होता. बाईंनी त्यांचा आवाज
गमावला होता. आम्हांला बाईंबद्दल जेव्हा समजलं तेव्हा आमच्या कानांवर आमचा विश्वासच बसला नाही. बाईंच्या प्रेमापोटी आम्ही लगेच बाईंच्या घरी भेटायला गेलो. भेटायला
गेल्यावर बाईंनी आम्हांला हाताच्या ईशाऱ्यानेच बसायला सांगितले. रोज
विद्यार्थ्यांना शांत करणाऱ्य़ा बाई आज स्वत: च शांत झाल्या होत्या. बाईंना बरं
वाटावं म्हणून आम्ही त्यांना रोज भेटायला जायचो त्यांची विचारपूस करायचो, त्यांच्या न बोलण्यातूनही आम्हांला सर्व काही कळत होतं. बाईंना आनंदी
बघायला आम्हांला फार आवडायचं पण हा आनंद क्षणभंगूर
असेल असं वाटलं नाही बाईंचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो पण तो दिवस कधीच
आला नाही.
....नियतीच्या मनात काय होतं कुणास ठाऊक प्रथमिकच्या निरोप समारंभाच्या आठवणी संपण्या
आधीच बाईंनी आम्हांला आठवणींचा निरोप दिला...... जरी आज आमच्या बाई आमच्याबरोबर
नसल्या तरी बाईंनी दिलेली शिकवण आमच्यासोबत आयुष्यभर राहिल. यशाच्या प्रत्येक
पायरीवर बाई तुमचा आशीर्वाद नेहमीच भासत राहिल.
बाई तुमची फार आठवण येतेय....